- मनोहर कुंभेजकरमुंबई - मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत उबाठा सेनेने केलेल्या घोटाळ्यावर अखेर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्यावर शिक्कामोर्तब केले. पुन्हा मतदार यादी तयार करा असे निर्देश विद्यापीठाला दिले. हा एक संघटीत आर्थिक ही घोटाळा आहे, त्यामुळे या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता मुंबई भाजपा अध्यक्ष आणि या प्रकरणात तक्रारदार असलेल्या आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
याबाबत आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की, आज आलेल्या अहवालातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे सगळे प्रकरण गंभीर आहे. एक आर्थिक घोटाळाही यामध्ये करण्यात आला आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, एकाच नंबर वरुन, एकाच बँक खात्त्यावरुन, एकाच एटीएम मधून मतदार नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. तेही विद्यापीठाच्या खात्यावर जमा न होता ते कंत्राटदाराच्या खात्यात पैसे गेले आहेत. आम्ही त्याचेही पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व सोबत या आर्थिक घोटाळ्यांचीही आयकर खात्यामार्फत सरकारने चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
आता घोटाळेबाजांचा अर्धा चेहरा उघड झाला, त्यांचा पूर्ण चेहरा उघड व्हायला हवा. विद्यापीठात राजकारण करुन, घोटाळे करुन यांनी विद्यापीठालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी उबाठाची सत्ता असताना विद्यापीठाच्या स्वायत्तेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न उबाठा सेनेच्या युवराजांनी केला होता. तर अंतिम वर्षे परिक्षा न घेण्याचा बालिश हट्ट करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा घाट घातला, तोही आम्ही असाच हाणून पाडला होता. आता सिनेट निवडणूकीत केलेला घोटाळा ही अत्यंत गंभीर बाब असून आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाच्या बदनामीला कारणीभूत असलेल्यांचे हे षडयंत्र उघड होण्याची गरज आहे, त्यामुळे फौजदारी चौकशी करा, अशी मागणी करताना शेलार यांनी "हे कसले वाघ हे, तर महापालिके पासून विद्यापीठा पर्यंत सर्वत्र घोटाळेबाज!" असा टोला लगावला आहे.