उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणे ‘लाख’ मोलाचे; लाखेच्या ६ लाख कांड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:14 AM2019-03-30T01:14:36+5:302019-03-30T01:15:01+5:30
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’मोलाची कामगिरी बजावायला लाखेचा वापर केला जाणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’मोलाची कामगिरी बजावायला लाखेचा वापर केला जाणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रासाठी सहा नग या प्रमाणे लाखेचे ६ लाख ८१ हजार नग कांडी लागतील. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणुकीतील पहिलीच वेळ असावी.
शासकीय कारवाईत लाखेची लालभडक मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानानंतर मतदान यंत्रे व त्याच्याशी निगडित साहित्य मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी ती सीलबंद केली जातात. त्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते.
लाख वितळविणार
लाख वितळवून मतदान यंत्रे सिलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील लाख वितळविण्यासाठी सुमारे ४ लाख ५५ हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.