मुंबई - वर्सोवा ते विरार असा सिलिंकचा सर्वे समुद्रात सुरू असल्याने वेसाव्यातील मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष आहे. या असंतोष वेसावा कोळीवाड्यातील मच्छीमारांनी काल एकत्र येऊन व्यक्त केला आणि जोरदारपणे आक्षेप घेतला. आणि सर्व कोळी बांधवांनी गावाच्या वतीने निर्धार केलेला आहे की वर्सोवा विरार सी लिंक कदापि होऊ देणार नाही.वेसावा गावातील सर्व संस्था प्रतिनिधी आणि हितचिंतक यांची जाहिर सभा काल रात्री वेसावा बंदर किनारी झाली या सभेमध्ये वेसावतील 500 हून अधिक स्त्री-पुरुषांनी सहभाग घेऊन निर्धार व्यक्त केला.
मासेमारी साठी सुप्रसिद्ध असणाऱ्या वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयेंद्र लडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेड, वेसावा कोळी सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड, वेसावा मच्छिमार नाखवा मंडळ ट्राॅलर आणि वेसाव्या गावातील पंचायतन संस्था असलेली वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांच्या विद्यमाने ही निर्धार सभा आयोजित केली होती.
कोस्टल रोडचा भाग असलेला वांद्रे वर्सोवा सिलिंकला विरोध वेसावातील कोळी बांधवांनी केला नव्हता. मात्र जसजसे या सिलिंकचे पोल समुद्रात पडू लागले तशी पारंपारिक मच्छीमारांमधील भीती अधिक तीव्र झाली आहे. साडेचारशे हून अधिक मच्छीमार वर्सोवा वांद्रे सिलिंग मुळे बाधित होत आहेत. ही भीती लक्षात घेता शासनाने नव्याने वर्सोवा ते विरार सीलिंग सर्वे केला . महामुंबईच्या या विकासामध्ये कोळी समाजाचे मासेमारी क्षेत्र संपूर्ण हिरावून गेले शासनाने अधिक्रमित केले आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा आमचा कोळी समाज उपजीवीके पासून वंचित झाला आहे. असे असताना खाड्याखाजण बुजून झाल्यावर थेट समुद्रात अतिक्रमण करणाऱ्या या शासनाच्या वर्सोवा विरार सीलिंग विरोधात वेसाव्यातील कोळी समाज एकजुटीने उभा राहणार असल्याचा निर्धार गावातील पंचायतन संस्था असलेल्या वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.
कोस्टल रोडच्या विरोधात आपण सगळा कोळी समाज एकत्र येऊन विरोध केला नाही म्हणून शासनाची हिंमत झाली थेट समुद्रात वहिवाट करण्याची. आपलं घर टिकेल तर देश टिकेल हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. आमचे घर टिकले नाही तर देश ही टिकणार नाही असा इशारा देऊन सर्व समाज बांधवांनी घराघरात जाऊन आंदोलन करावे असे आव्हान कोळी महिलांच्या नेत्या राजेश्री भानजी यांनी केले.
नियोजित आराखड्यानुसार वर्सोवा विरार सिलिंग आखणी ही दुर्मिळ मत्स्यजीव आणि कासवांचे प्रजनन आणि वास्तव्य असणाऱ्या सागरी पट्ट्यामधूनच जात असल्याचे समुद्र विज्ञान संस्थेचा संदर्भ देऊन मच्छीमार नेते प्रदीप टपके यांनी वेळ पडल्यास आपण कोणत्याही राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व न करता केवळ समाज हितासाठी वर्सोवा विरार सीलिंग साठी विरोधात उभा राहणार आणि सर्व कोळी बांधवांनी देखील निर्धार करावा असे आवाहन त्यांनी केले. मच्छीमारांची गाव आणि समुद्र यामध्ये आडवा येणारा सिलिंग कदापि आम्ही सहन करणार नाही.आमचं समुद्राशी नातं सेतू बांधून तोडू देणार नाही अशा तीव्र शब्दात वेसावा मच्छीमार नाखवा मंडळाचे सेक्रेटरी जयराज चंदी यांनी व्यक्त केली.
आपण आपले सागर किनारे सागरी पट्टावर मत्स्य प्रकल्प उभे केले नाही म्हणून आज शासनाची हिंमत होत असल्याची भावना व्यक्त करून समुद्र आम्हा कोळ्यांचा आहे कुणाच्याही मालकीचा नाही अशी भावना व्यक्त करून वेसावा विरार सी लिंक होऊ द्यायचा नाही असा निर्धार सभाध्यक्ष असलेल्या जयेंद्र लडगे यांनी व्यक्त केला. यावेळी नाखवा मंडळाचे संस्थापक पृथ्वीराज चंदी यांनी आपल्या सिलिंग विरोधी निर्धार व्यक्त करून सभेचे सूत्रसंचालन केले.यावेळी पराग भावे , नारायण कोळी, महेंद्र लडगे, पंकज भावे, देवेंद्र काळे, जनार्दन भालचंद्र माने, मनीष भुनगवले, विक्रांत चिखले , सदाशिव राजे आदींची भाषणे झाली.