४०० हून अधिक गुन्ह्यांची नाेंद : सायबर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या १४ हजार फेक पोस्टचा शोध महाराष्ट्र सायबरने घेतला आहे. यात आतापर्यंत ४०० हून अधिक गुन्हे नोंद करून १०० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन प्रकरणाच्या निमित्ताने राज्य सरकार, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू होते. समाजमाध्यमांवर असंख्य बनावट खाती तयार करून त्याआधारे खोटी, चुकीची, बदनामी करणारे साहित्य हेतुपुरस्सर पसरवले जात होते, असा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे नोंदवून बनावट खाती हाताळणाऱ्या, बदनामी करणाऱ्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी ८० हजारांहून अधिक बनावट खाती समोर आली. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोरोना तसेच विविध गोष्टींबाबतही खोटी माहिती शेअर केली जात हाेती. फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बनावट खात्यांचा वापर केला जात असल्याचे समाेर आले. नुकताच एंजल प्रिया नावाचा ट्रेंड दिसून आला. यात मुले ही मुलगी असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचे सायबर विभागाच्या तपासात समोर आले.
* १०० हून अधिक जणांवर कारवाई
कोरोनाच्या काळात तब्बल १४ हजार फेक पोस्टचा शोध महाराष्ट्र सायबरने लावला. त्यानुसार संबंधितांवर कारवाई सुरू आहे. यात आतापर्यंत ४०० हून अधिक गुन्हे नोंद करत १०० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
........................