मुंबई : अपहृत, हरविलेल्या तसेच बालकामगार मुलांच्या शोधमोहिमेसाठी मुंबई पोलिसांकड़ून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या महिनाभरात मुंबईत १४५ मुले, मुलींचा शोध घेण्यात आला. यात, ११६ मुलींचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांकड़ून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे दहावे पर्व आहे. गेल्या नऊ वर्षात पोलिसांनी विविध उपक्रम हाती घेतले. यात त्यांना तीन हजार १३५ अल्पवयीन मुले, प्रौढ व्यक्तींचा शोध घेण्यात यश मिळाले होते. मुंबईत मे २०२१ पर्यंत ९०९ अल्पवयीन मुले, मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. अशात १ जून ते ३० जूनदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत मुंबई पोलिसांनी एकूण १४५ मुलांचा शोध घेतला. त्यात, महिनाभरात विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या बेपत्ता १०५ मुली आणि २३ मुलांचा समावेश आहे, तर रेकॉर्डवर नसलेली; परंतु मिळून आलेली नऊ बालके यादरम्यान पोलिसांच्या हाती लागले. या मोहिमेंतर्गत एकूण ११६ मुली आणि २९ मुले मिळून आले आहेत. यातील बहुतांश मुलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.