एका दिवसात २० हजार संपर्कातील व्यक्तींचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:45 AM2020-09-20T01:45:04+5:302020-09-20T01:46:20+5:30
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम । स्वयंसेवक पोहोचले घरोघरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मंगळवारपासून मुंबईत सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पालिकेचे स्वयंसेवक घरोघरी तपासणी करीत आहेत. या मोहिमेअंतर्गत बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील तब्बल २० हजार ७५१ लोकांचा
शोध शुक्रवारी एका दिवसात घेण्यात
आला आहे. तसेच चार दिवसांत मुंबईतील आणखी ९०० इमारती सील करण्यात आल्या आहेत.
आॅगस्ट महिन्यात मुंबईतील कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला होता. मात्र १ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील ४० लाख घरापर्यंत पालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवक पोहोचणार आहेत. प्रत्येक घरातील सदस्यांचे तापमान आणि प्राणवायूची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार उपलब्ध केले जाणार आहेत.
तसेच तपासणीदरम्यान बाधित रुग्ण आढळलेली इमारत अथवा इमारतीचा भाग तातडीने सील करण्यात येत आहे. १५ ते १८ सप्टेंबरपर्यंत या चार दिवसांत ९०२ इमारती सील करण्यात आल्या आहेत. बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. मात्र हा नियम अनेक ठिकाणी पाळला जात नसल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे या मोहिमेअंतर्गत बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील
लोकांना शोधण्यावरही भर देण्यात आला आहे.
बाधित क्षेत्रात घट, सील इमारती वाढल्या...
मुंबईत १४ सप्टेंबर रोजी ८,६३७ इमारती सील होत्या. पालिकेच्या सुधारीत नियमानुसार एकाच इमारतीत दहापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने शुक्रवारपर्यंत एकूण ९,६६५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर १४ सप्टेंबर रोजी झोपडपट्ट्या-चाळींमध्ये ५६४ क्षेत्र बाधित होती. गेल्या चार दिवसांत बाधित क्षेत्रांची संख्या ५९२वरून ५८५ झाली आहे.
च्पालिकेच्या मोहिमेअंतर्गत प्रत्येक चमू दररोज सुमारे ५० कुटुंबांशी संपर्क साधत आहे. तसेच संपूर्ण मोहीम कालावधी दरम्यान प्रत्येक कुटुंबाशी साधणारपणे दोन वेळा संपर्क साधणार आहे.
च्तापमान तपासताना सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रत्येक चमूकडे ‘थर्मल गन’ असेल. तसेच प्राणवायूची पातळी मोजण्यासाठी ‘आॅक्सिमीटर’ असणार आहे.
च्प्राथमिक पडताळणी दरम्यान एखाद्या व्यक्तीमध्ये कोविडची लक्षणे आढळून आल्यास त्याला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक व अन्य गंभीर आजार असलेल्या घरातील सदस्यांची नोंद घेणार आहे.