लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या थेट संपर्कातील किमान २० ते जास्तीत जास्त ३० संशयितांची चाचणी करण्याचा सल्ला राज्याच्या टास्क फोर्सने जिल्हा व स्थानिक प्रशासनाला दिला आहे. त्याचप्रमाणे, संशयितांची आता रॅपिड अँटिजनऐवजी आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर द्यावा, असेही टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपायांचे नियोजन आणि तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खाटांची उपलब्धतता वाढविणे, कोविड उपचार केंद्र व रुग्णालये इत्यादींची संख्या वाढविण्यासह ते अधिक सुसज्ज करणे, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे, तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीचे नागरिक शोधण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोना प्रसारास अटकाव व्हावा या उद्देशाने कोरोनाबाधित रुग्णाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवले जाते. प्रत्येक बाधित रुग्णामागे १५ व्यक्तींचा शोध घेण्याचे निर्देश दुसऱ्या लाटेच्या वेळी देण्यात आले होते. आता हेच प्रमाण वाढवून प्रत्येक रुग्णामागे ३० करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे. या माध्यमातून राज्यासह जिल्ह्या-जिल्ह्यातील संसर्गाच्या स्थितीचा आढावाही घेण्यात येणार आहे.