Join us

ठाणे, पालघरमधील ३६९ प्रवाशांचा शोध सुरू; गेल्या महिनाभरात ब्रिटनमधून आल्याने होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 5:32 AM

CoronaVirus News : ब्रिटनहून आलेल्यांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागांनी सुरू केले आहे. काही महापालिकांनी काहींचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत.

कल्याण : ब्रिटनमधील काही भागांत नवीन कोरोना विषाणू आढळल्याने महिनाभरात ब्रिटनहून ठाणेपालघर जिल्ह्यांत दाखल झालेल्या ३६९ जणांना शोधून त्यांची तपासणी करण्याचे आव्हान सर्व संबंधित महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे उभे ठाकले आहे. यात ठाणे शहरात दाखल झालेल्या १३४, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ५५, वसई-विरारमध्ये ४२ तर उल्हासनगर महापालिका हद्दीत दाखल झालेल्या १३ जणांचा समावेश आहे. ब्रिटनहून आलेल्यांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागांनी सुरू केले आहे. काही महापालिकांनी काहींचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. ब्रिटनहून आलेल्यांना शोधून पडताळणी करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होत असून मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे सर्व महापालिका आयुक्तांच्या संपर्कात आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूची बाधा झालेल्यांसाठी ठाण्यातील ग्लोबल इस्पितळात उपचारांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या की, नव्या कोरोना विषाणूचा प्रसार मूळ कोरोना विषाणूपेक्षा जास्त वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून कल्याण-डोंबिवलीत आलेल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सरकारकडील यादीनुसार, या कालावधीत ५५ जण कल्याण-डोंबिवलीत आले आहेत. मात्र प्रत्यक्ष पडताळणीत काही नावांची द्विरुक्ती झाली असून काही पालिका हद्दीबाहेरील आहेत. केडीएमसी हद्दीतील असलेल्यांची संख्या ४५ आहे. या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट  निगेटिव्ह आली आहे. मात्र, खबरदारी म्हणून पुन्हा आरोग्य तपासणीकरिता त्यांचे नमुने घेतले जात आहेत.

आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनफेरचाचणीत जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यात कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आहे का, याची तपासणी करण्याकरिता नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवले जातील. अन्य राज्यांतून किंवा राज्याच्या अन्य भागांतून कुणी प्रवासी ब्रिटनहून कल्याण-डोंबिवलीत आले असल्यास त्यांनी जिल्हा किंवा पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसठाणेपालघर