मेहताच्या मालमत्तांचा शोध सुरू; न्यू इंडिया बँकप्रकरणी ‘तो’ व्हिडीओ, पंचनामा पोलिसांना सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:49 IST2025-02-25T06:49:45+5:302025-02-25T06:49:52+5:30

मेहताने दिलेल्या माहितीत तफावत असल्याने या आठवड्यात त्याची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याबाबत अर्ज करणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले.

Search begins for Mehta's properties; 'That' video, Panchnama submitted to police in New India Bank case | मेहताच्या मालमत्तांचा शोध सुरू; न्यू इंडिया बँकप्रकरणी ‘तो’ व्हिडीओ, पंचनामा पोलिसांना सादर

मेहताच्या मालमत्तांचा शोध सुरू; न्यू इंडिया बँकप्रकरणी ‘तो’ व्हिडीओ, पंचनामा पोलिसांना सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : न्यू इंडिया को. ऑप. बँकेच्या १२२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेला महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्या मालमत्तांचा शोध घेण्यास आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे. पुणे रजिस्ट्रारला याबाबत पत्रव्यवहार करून मेहताच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती मागविण्यात आली आहे. दुसरीकडे, घोटाळा उघडकीस आल्यानंतर ‘आरबीआय’ने मेहताच्या कबुली जबाबचा व्हिडीओ आणि पंचनामा आर्थिक गुन्हे शाखेला दिला आहे. त्यात फक्त घोटाळा केल्याचे कबूल केले असेल तरी तो कसा केला, याबाबत त्याने काही सांगितलेले नाही. 

मेहताने दिलेल्या माहितीत तफावत असल्याने या आठवड्यात त्याची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याबाबत अर्ज करणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले. अरुणभाईला दिलेले पैसे दोन ट्रस्टच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट करण्यासाठी दिल्याचेही मेहताने पोलिसांना सांगितले. मात्र, त्या ट्रस्ट नेमक्या कुठल्या आहेत? त्याबाबत काहीही माहिती त्याने दिलेली नाही. अरुणभाईच्या चौकशीतून या ट्रस्टचे गूढ उकलेल, असे  अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मेहताने उर्वरित पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा संशय आहे. त्याच्या नावावर कुठे आणि किती मालमत्ता आहे? त्याची माहिती घेण्यासाठी पुण्याच्या रजिस्ट्रार कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले आहे.

माजी सीईओ अभिमन्यू भोअनच्या खात्यात कोट्यवधी रुपये गेल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर आणखीन कुणाचा हात आहे का? याचाही तपास सुरू आहे.

...तर संचालकांचीही चौकशी
या पैशांवर बँकेच्या संचालक मंडळाचे लक्ष होते का? एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम बाहेर जात असल्याने याकडे कुणाचेही लक्ष का गेले नाही? पैसे कसे बदलले गेले? याबाबत चौकशी सुरू आहे. बँकेच्या संचालकांपैकी कुणाचे नाव समोर आल्यास त्यांचीही चौकशी करण्यात येईल, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

Web Title: Search begins for Mehta's properties; 'That' video, Panchnama submitted to police in New India Bank case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक