Join us

उमेदवारांकडून कार्यालयांचा शोध

By admin | Published: February 10, 2015 12:25 AM

महापालिका निवडणुकीच्या आरक्षणानंतर अनेकांनी आपले प्रभाग निश्चित केले आहेत. मात्र सर्वच राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार यांच्यामुळे एका

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईमहापालिका निवडणुकीच्या आरक्षणानंतर अनेकांनी आपले प्रभाग निश्चित केले आहेत. मात्र सर्वच राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार यांच्यामुळे एका प्रभागात पाचपेक्षा जास्त उमेदवार आमनेसामने येणार आहेत. अशा इच्छुकांकडून कार्यालयासाठी जागेची मागणी वाढू लागली आहे.पालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीला झालेल्या विलंबामुळे दिवस थोडे आणि सोंगे फार अशी परिस्थिती आहे. अशातच प्रभागांत झालेल्या अनपेक्षित बदलांमुळे अनेकांचे प्रभाग दोन किंवा तीन प्रभागांत विभागले गेले आहेत. त्यामुळे मतदारांची तोंडओळख करून घेताना इच्छुकांच्या नाकी नऊ आले आहेत. त्याकरिता दोन ते तीन महिन्यांसाठी रिकामे गाळे मिळवण्याची त्यांची लगबग आहे. मात्र एकाच प्रभागात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यापुढे जागेचाही प्रश्न पडला आहे. हवे ते भाडे मोजून अथवा वशिला वापरून ताबा मिळवण्यात येत आहे. जागांच्या ‘पळवापळवी’मुळे घणसोली व नेरूळ येथील इच्छुक उमेदवारांना निश्चित केलेले कार्यालय गमवावे लागले आहे. या स्पर्धेचा पुरेपूर फायदा जागामालक घेत आहेत. ही कार्यालये अवघ्या ३ ते ४ महिन्यांकरिता भाड्यावर घेतली जातात. त्याकरिता ५ ते २५ हजार रुपयेपर्यंतचे महिना भाडे भरण्याची तयारी त्यांना ठेवावी लागणार आहे. रहदारीपासून दूर असलेल्या जागेसाठी किमान ५ हजार रुपये तर चौकालगत अथवा मार्केट आवारात असलेल्या छोट्याशा गाळ्यासाठी देखील २५ हजार रुपयेपर्यंतचे भाडे उमेदवारांना सांगण्यात येत आहेत. परंतु प्रत्येक उमेदवार हा जागेच्याच शोधात असल्याने हातची संधी सोडायचे धाडस हे इच्छुक उमेदवार टाळणार आहेत. (प्रतिनिधी)