आप्पासाहेब देसाई पिता-पुत्रांचा शोध सुरू, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 06:13 AM2023-08-28T06:13:13+5:302023-08-28T06:13:22+5:30
वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, सायन या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा आशालता फाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार व न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देसाई यांच्यासह अन्य सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
मुंबई : सायन येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेमध्ये तसेच शालिनी सहकारी बँक लिमिटेडमधून सुमारे पाच कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून ॲड. आप्पासाहेब देसाई, वरुण देसाई, स्वप्नील देसाई आणि प्रवीण शितोळे यांच्याविरोधात वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ॲड. आप्पासाहेब देसाई, त्यांचा मुलगा वरुण देसाई आणि स्वप्नील देसाई यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. देसाई पिता-पुत्रांचा शोध सुरू आहे.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, सायन या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा आशालता फाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार व न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देसाई यांच्यासह अन्य सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला. ॲड. आप्पासाहेब देसाई तसेच अन्य सदस्यांवर संस्थेचा ताबा घेणे, बोगस खाती उघडून निधीचा अपहार करणे, तसेच ५ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फसवणुकीचा आकडा वाढणार?
गुन्हा दाखल झाल्यानंतर देसाई यांच्यासह अन्य सदस्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. याप्रकरणात चौकशी महत्त्वाची असल्याचा ठपका ठेवून, नुकताच सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलिस याप्रकरणात पुढे काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. फसवणुकीचा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी तपास सुरू असून, अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे वडाळा टी टी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आरगडे यांनी सांगितले.
एक्झिक्युटिव्ह कमिटीने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी आप्पासाहेब देसाई यांना जनरल सेक्रेटरी व सभासदपदावरून काढून टाकले असताना संस्थेच्या जागेचा व विद्यालयांचा बेकायदा ताबा घेतल्याबाबतही आरोपात नमूद आहे.