मुंबई : कोरोना महासाथीचे चक्र थांबल्यानंतर गेल्यावर्षी अचानक गोवरच्या आजाराने डोके वर काढले. विशेषत: मुंबईत गोवरने काही काळ थैमान घातले. या उद्रेकात सहा महिन्यांच्या मुलांना गोवरची लागण झाल्याचे निदर्शनास आले. लस उपलब्ध असतानाही हा जुना आजार उद्भवला कसा, मुलांना त्याची लागण झाली कशी, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नायर हॉस्पिटल आता सर्वेक्षण करणार आहे.
आतापर्यंत नवजात अर्भकाला मातेकडूनच गोवरविरोधातील अँटिबॉडीज मिळत असत. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर नऊ महिन्यांनी गोवरचा पहिला तर १५व्या महिन्यात दुसरा डोस दिला जातो. मात्र, अचानक उद्भवलेल्या गोवरच्या साथीने खळबळ उढवली. या सर्व पार्श्वभूमीवर २३ ते ३७ वयोगटांतील महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्यात गोवरविरोधातील अँटिबॉडीज सापडतात का, हे पाहिले जाणार आहे. यासाठी नायर हॉस्पिटलच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागात तयारी सुरू करण्यात आली आहे. हा अभ्यास एम ईस्ट वाॅर्डात करण्यात येणार आहे.
काय शोधणार?
मातेकडून नवजात अर्भकांना गोवर विरोधातील अँटिबॉडीज मिळतात का?संबंधित वयोगटांतील महिलांच्या शरीरात अँटिबॉडीज आहेत का?पालक मुलांना गोवरची लस द्यायला का नकार देतात किंवा लस का देतात?गोवरविरोधात लस आपल्या पाल्याला देण्यासाठी पालकांना कोणत्या गोष्टी प्रवृत्त करतात?
सर्वेक्षणात महिलांच्या शरीरात गोवरविरोधात लढण्याच्या अँटिबॉडीज आहेत किंवा कसे, याचा तपास केला जाईल. काही विशेष आढळल्यास आरोग्य धोरणात आवश्यक बदल केले जातील. - ऋजुता हाडये, प्रमुख, जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, नायर हॉस्पिटल