श्रद्धाचा मोबाईल शोधण्यासाठी भाईंदर खाडीत शोध मोहीम
By धीरज परब | Published: November 24, 2022 09:11 PM2022-11-24T21:11:16+5:302022-11-24T21:16:00+5:30
मीरारोड - दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर चा मोबाईल शोधण्यासाठी गुरुवारी भाईंदर खाडीत सुमारे ५ तास शोधमोहीम राबवली.
मीरारोड - दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर चा मोबाईल शोधण्यासाठी गुरुवारी भाईंदर खाडीत सुमारे ५ तास शोधमोहीम राबवली. दुपारी २ वाजल्या पासून सायंकाळी सात वाजे पर्यंत दिल्ली पोलिसांचे पथक, माणिकपूर पोलीस , स्थानिक मच्छीमार सह निष्णात पाणबुड्या सह खाडीत मोबाईल चा शोध घेत होते.
दिल्ली पोलिसांना श्रद्धा हत्याकांड चा आरोपी आफताब ह्याच्या चौकशीत त्याने श्रद्धाचा मोबाईल रेल्वे पुला वरून भाईंदर खाडीत टाकल्याची माहिती मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सदर गुन्ह्यात श्रद्धाचा मोबाईल हा मोठा पुरावा ठरू शकत असल्याने पोलिसांनी मोबाईल शोधण्यासाठी दोन बोटींची व्यवस्था केली होती. भाईंदर खाडीत शोध घेतला असला तरी पोलिसांना मोबाईल सापडला नाही. त्यामुळे शोधमोहीम सुरू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर खाडीत पडलेला मोबाईल शोधणे अवघड असून तो सापडेल याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.