Join us

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध सुरू, कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:03 PM

संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकांलांमध्ये झालेल्या गोंधळाला जबाबदार धरून कुलगुरू संजय देशमुख यांची मंगळवारी  उचलबांगडी करण्यात आली होती. दरम्यान, देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी कस्तुरीरंगन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. कस्तुरीरंगन यांनी याआधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरूपद आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. अवकाश शास्त्रज्ञ असलेल्या कस्तुरीरंगन यांनी इस्त्रोचे माजी प्रमुख म्हणूनही काम पाहिले होते. संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.    मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेला विलंब अखेर कुलगुरू संजय देशमुख यांना भोवला होता.  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्याने मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता. या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाने यावर्षी घेतलेल्या परीक्षांचे निकाल लागण्यास प्रचंड विलंब झाला. पेपरतपासणीमध्ये झालेला गोंधळ आणि निकालांना झालेल्या उशिरामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात कुलगुरू सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे देशमुख यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्यपालांनी संजय देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना कुलगुरूपदावरून हटवले.  मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या गोंधळामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. तसेच निकालात झालेल्या गोंधळाविषयी कुलगुरूंकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. त्यानंतर आॅनलाइन निकालात गोंधळाविषयी माहिती देणारे विस्तृत पत्र कुलगुरूंनी राज्यपालांना पाठविले होते.  विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून नवनव्या डेटलाइन देण्यात येत होत्या. मात्र ऑक्टोबर महिन्यापर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ निवळला नव्हता. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचेही समोर आले होते. या गोंधळामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबई