लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बिहारमधील कत्रीसराय, बिहार शरीफ तसेच वारसलिंगज या नक्षलग्रस्त भागातून सिप्ला कंपनीच्या नावाने कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात होती. या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश करीत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात असून यात हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
सायबर पोलिसांनी बिहारमधील कॉल सेंटर उद्ध्वस्त करून ५ जणांना अटक करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. यात धनंजय उर्फ रामबरण पंडित (२०), शरवण उर्फ कौशल पासवान (२९), धर्मजय कुमार उर्फ कारू प्रसाद (२९), नितीश कुमार उर्फ मिथिलेश प्रसाद (२७), सुमंत कुमार उर्फ शत्रुघ्न प्रसाद (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर संतोष कुमार, सूरज कुमार आणि सूरज कुमार उर्फ गोलू यांचा शोध सुरू आहे. यात पंडित आणि पासवान नागरिकांना कॉल करायचे. तर अल्पवयीन मुलावर एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची जबाबदारी होती. त्या बदल्यात त्याला कमिशन मिळत होते.