मुंबई : मुख्य रस्ते व द्रुतगती महामार्गावर शौचालयाची सुविधा कमी असल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. त्यामुळे ‘शौचालय ऑन व्हील’ ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच मुख्य रस्त्यांवर महापालिका जागेचा शोध घेत आहे. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी निश्चित केलेल्या जागांची पाहणी केली.
मुंबईत सार्वजनिक शौचालयांची कमतरता आहे, त्यात मुख्य रस्ते अथवा द्रुतगती महामार्गावर ही सोय मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे मुख्य रस्ते, द्रुतगती महामार्गावर वाहन उभे करून नागरिकांची सोय केली जाणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शौचालय ऑन व्हील उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापौर, उपमहापौर सुहास वाडकर, आमदार विलास पोतनीस यांनी बोरिवली, दहिसरमधील विविध ठिकाणांची पाहणी केली. यावेळी उपायुक्त (परिमंडळ- ७) विश्वास शंकरवार उपस्थित होते.
या जागांची पाहणीकांदिवली पूर्व येथील गंगानगर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली पूर्व येथील पेट्रोल पंपच्या बाजूला पश्चिम द्रुतगती महामार्ग, सुधीर फडके पुलाच्या बाजूला, दहिसर विभागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील द्रुतगती महामार्गाच्या पुलाच्या खाली, आदिनाथ टाॅवर, राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सर्व्हिस रोड या जागांची पाहणी केली. वाहतुकीला कुठल्याही प्रकारे अडथळा न होता नागरिकांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ही ‘शौचालय ऑन व्हील’ बस ठेवण्याचे निर्देश महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यासाठी शौचालय ऑन व्हीलमुंबई शहरातून दहिसर, बोरिवलीकडे जाताना किंवा येताना कमीत कमी दोन तासांचा अवधी लागतो. मात्र महामार्गावर शौचालयाची सुविधा कमी प्रमाणात असल्यामुळे या कालावधीत ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह असलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी कांदिवली, बोरिवली, दहिसरमधील तिन्ही विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या जागांची पाहणी करण्यात येत आहे. स्थानिक नगरसेवक व संबंधित विभाग यांनी संयुक्त बैठक घेऊन लवकरात लवकर स्थळ निश्चित करण्याचे निर्देश दिल्याचे महापौरांनी सांगितले.