Join us

‘त्या’ मुलासाठी शोध पथक मुंबईबाहेर रवाना; डार्कनेटवरून डाउनलोड केलेल्या खेळाच्या नादात घर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 2:04 AM

डार्कनेटवरून डाउनलोड केलेल्या गेमच्या नादात घर सोडलेल्या गोवंडीतील १६ वर्षीय मुलाच्या शोधासाठी तपास पथक मुंबईबाहेर रवाना झाले आहे. घर सोडताना या मुलाने १५ हजार रुपयांसह इंटरनेट नसलेला फोनही नेला होता.

मुंबई : डार्कनेटवरून डाउनलोड केलेल्या गेमच्या नादात घर सोडलेल्या गोवंडीतील १६ वर्षीय मुलाच्या शोधासाठी तपास पथक मुंबईबाहेर रवाना झाले आहे. घर सोडताना या मुलाने १५ हजार रुपयांसह इंटरनेट नसलेला फोनही नेला होता. त्याच आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तसेच ज्या लॅपटॉपवर तो गेम खेळत होता, तो लॅपटॉप तपासणीसाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे. मोबाइल आणि लॅपटॉपच्या आधारे मुंबई पोलिसांसह, गुन्हे शाखा राज्य दहशतवाद विरोधी पथकही अधिक तपास करत आहेत.‘मी चूक करतोय, पण मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, माझा मृत्यू झालाय असे समजा,’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून २९ आॅक्टोबर रोजी दहावीतील या मुलाने घर सोडले होते. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. आॅनलाइन गेमची आवड असलेल्या या मुलाचा लॅपटॉप पोलिसांनी तपासला, तेव्हा डार्कनेटवरून त्याने गेम डाउनलोड केल्याचे आढळले. या गेममध्ये तीन टप्पे असून, तिसरा टप्पा जिवावर बेतणारा ठरू शकतो, अशी माहिती पुढे येत आहे. अधिक तपासणीसाठी पोलिसांनी लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे.मुलाने घरातून निघताना पैशांबरोबरच त्याने मोबाइलही सोबत घेतल्याचे समजले. मात्र, त्या मोबाइलमध्ये इंटरनेट नाही. शिवाय तो मोबाइलही बंद आहे. मुलगा कुणाच्या संपर्कात येत नाही, तोपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे. त्याने काही सूचना लिहिलेले कागदही सोबत नेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मुलाबाबत मुंबईबाहेरची लिंक पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, एक तपास पथक मुंबईबाहेर रवाना झाले आहे, तसेच मुलाचा फोटो सर्वत्र व्हायरल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या आधारेही पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मुलाने त्याच्याकडील पैशांतून नवीन मोबाइल आणि सिम कार्ड विकत घेतल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे, तसेच त्याच्या शालेय जीवनाबाबतही पोलीस कसून चौकशी करत आहेत. शाळेतील शिक्षक, वर्गमित्रांकडून पोलीस माहिती काढत आहेत. आतापर्यंत त्याच्या मित्र-मैत्रिणी, जवळचे नातेवाईक, तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याचे गोवंडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई