दुसऱ्याच्या आधारापेक्षा, स्वत:चा शोध घ्या
By admin | Published: March 8, 2017 04:49 AM2017-03-08T04:49:46+5:302017-03-08T04:49:46+5:30
प्रख्यात अभिनेत्री आणि लेखिका दिव्या दत्ता हिने ‘लोकमत’ने सखींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांनी आपले गोड-कटू अनुभव सखींसमोर मांडले.
प्रख्यात अभिनेत्री आणि लेखिका दिव्या दत्ता हिने ‘लोकमत’ने सखींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांनी आपले गोड-कटू अनुभव सखींसमोर मांडले. मंगळवारी विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात सखी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर हा प्रवास उलगडला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ‘मी अँड मा’ या पुस्तकाचा प्रवास तिने उपस्थितांसमोर उलगडला, या वेळी सखी मंचच्या सदस्यांनी दिव्या यांना प्रश्न विचारले. याप्रसंगी तिने तिच्या आईसोबतचे गोडगुपित उलगडले, ही मुलाखत खास वाचकांसाठी...
‘मी अॅण्ड मा’ पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा काय?
- माझे आणि आईचे खूप स्पेशल नाते होते, गेल्या वर्षी मी तिला गमावले, त्या कठीण प्रसंगानंतर आईच्या रूपातील ‘मैत्रिणी’सोबतच्या नात्याचा प्रवास शब्दबद्ध करावा असा विचार आला. आणि लगेचच त्याची प्रक्रिया सुरू केली. आमच्या घरात कायमच भावापेक्षा मला जास्त स्वातंत्र्य मिळाले, कारण आईचा माझ्यावर खूप विश्वास होता. लहानपणापासून आईच्या सहवासातच वाढल्याने सगळे काही तीच होती, त्यामुळे तिची पोकळी भरून निघणे शक्य नाही.
विचारापासून प्रत्यक्ष शब्दांत हा प्रवास मांडण्यापर्यंतचा प्रवास कसा होता?
- गेल्या वर्षी याच महिन्याच्या दरम्यान आई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होती. तो क्षण आजही शब्दांत मांडता येत नाही, आपले माणूस गमावण्यासारखे दुसरे दु:ख नाही. कारण ती माझी ‘बेस्ट फ्रेंड’ होती, ती असताना दुसऱ्या कोणाचीच मला गरज भासायची नाही. आमच्या नात्यात एक काळ असा आला, ज्या वेळी मी तिची आई झाले. तिच्या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडू लागले. हाच प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ही केवळ माझीच नाही तर प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याची कहाणी आहे.
तू लहान असताना वडिलांचे निधन झाले, त्या वेळेस आई कशी उभी राहिली?
- पंजाबमधील एका गावात आमचे कुटुंबीय राहायचे. आई-बाबा दोघेही डॉक्टर होते, त्या वेळी त्या वातावरणात मी खोडकर आणि मस्तीखोर झाले. त्यानंतर माझी वर्तणूक पाहून आई-बाबांनी मला आत्याकडे दिल्लीला पाठविले. दिल्लीला गेल्यानंतर प्रत्येक दिवशी मी घरी जाण्याची वाट पाहत असे. तीन वर्षांनंतर अचानक एकेदिवशी बाबा गेल्याचे कळाले, क्षणभर पायाखालची जमीन सरकलेली; मी नि:शब्द झाले होते. पण मग आई मला दिल्लीहून घरी घेऊन गेली, तिने कधीच डोळ्यातले पाणी माझ्यासमोर आणले नाही. ती कायम आपले चेहऱ्यावरचे दु:ख लपवून हसत राहायची. ती एका कोपऱ्यात बसून कवितेतून व्यक्त व्हायची, या तिच्या कवितांचे दोन काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाले. तिने आमच्या पालनपोषणासाठी पांढऱ्या रंगाचे वस्त्र नाकारले आणि बाबांच्या इच्छेप्रमाणे तिने खंबीर होऊन आम्हाला वाढविले.
आयुष्यात कुणाची तरी सोबत असणे किती गरजेचे आहे?
- आयुष्यातील चढ-उतारांमध्ये कुणाची तरी सोबत लागते, कारण ही सोबत नसली की सतत एक पोकळी जाणवते. मग अशा परिस्थितीत दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचा शोध घेण्यापेक्षा स्वत:ला शोधा, स्वत:ला भेटा. आरशात स्वत:ला पाहिले की, धीर देणारी आणि कायम यश-अपयशात पाठीशी उभी राहणारी खंबीर व्यक्ती नक्की सापडते.
नुकतीच ‘लिपस्टीक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाची सेन्सॉरने अडवणूक केलीय, बॉलीवूडमध्येही लिंगभेद मानणाऱ्यांची फळी आहे का?
आपल्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची माणसे आहेत. त्यामुळे विचारसरणींमध्ये भेद असणारच, पण अशा वेळी त्या घटकांना महत्त्व न देता समानता मानणाऱ्यांना एकत्र करून त्याचा विस्तार करावा; म्हणजे भेद मानणाऱ्यांचे प्रमाण आपसूकच कमी होते. सध्या सिनेमा, नाट्यसृष्टीत वेगळ्या धाटणीच्या कलाकृती येताहेत, ‘लिपस्टीक अंडर माय बुरखा’ त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे चौकटीपलीकडच्या कलाकृतींना विरोध होतोच, पण तो नक्की मावळेल आणि हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीतून बाहेर येईल, असा विश्वास आहे. याशिवाय समाजात बदल घडविण्यासाठी सोशल मीडिया या नव्या माध्यमाचा वापर करू शकतो.
संकलन : स्नेहा मोरे