इन्स्टाग्रामवरुन IPL तिकीट सर्च केलं अन् १.५ लाख रुपये गमावले! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:02 PM2024-04-12T12:02:08+5:302024-04-12T12:03:48+5:30
बोरिवली पोलिसांत भामट्यांविरोधात तक्रार.
मुंबई : आयपीएल मॅचचे तिकीट इन्स्टाग्रामवर मिळालेल्या क्रमांकावरून मिळवण्याचा प्रयत्न करणे विद्यार्थ्याला महागात पडले. त्याला अनोळखी भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला. याविरोधात त्याने बोरिवली पोलिसांत तक्रार दिली.
तक्रारदार क्रित गुप्ता (वय १९) हा बोरिवली पश्चिमच्या कस्तुर पार्क परिसरात राहतो. त्याला आणि त्याच्या मित्रांना आयपीएल क्रिकेट टीमच्या १४ एप्रिल रोजीचे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या मॅचचे तिकीट हवे होते. त्यासाठी त्याने गुगलवर ऑनलाइन तिकीट सर्च केले. तेव्हा त्याला इन्स्टाग्रामची एक लिंक मिळाली. क्रितने या लिंकवर ऑनलाइन मॅच का तिकीट मिलेगा क्या असा मेसेज पाठवला. तेव्हा समोरून त्याला एक मोबाइल नंबर दिला गेला व क्रितने त्यावर संपर्क साधला.
तिघांनी साधला संवाद-
मॅचच्या तिकिटासाठी समोरच्या तीन व्यक्तींनी तीन वेगवेगळे नंबर दिले. त्या तिघांनी सांगितल्याप्रमाणे थोडे-थोडे करत एकूण १ लाख ५२ हजार १८६ रुपये अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पाठवले. मात्र, इतके पैसे दिल्यानंतरही समोरच्या व्यक्तींनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आयपीएल मॅचचे तिकीटही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानुसार त्याने तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.