आत्महत्येच्या 'बेस्ट वे' चे गुगलवर सर्चींग! इंटरपोल अलर्ट अन् तरुणाचे वाचवले प्राण
By गौरी टेंबकर | Published: September 27, 2023 06:58 PM2023-09-27T18:58:12+5:302023-09-27T18:59:23+5:30
क्राईम ब्रांचच्या युनिट ११ ची कारवाई.
गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आत्महत्या करण्यासाठीचे चांगले मार्ग कोणते हे सर्च करण्याचा प्रयत्न एका २८ वर्षाच्या तरुणाने गुगलवर केला. त्यावरून तो तरुण आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे असा अलर्ट मुंबई पोलिसांना इंटरपोलवरून प्राप्त झाल्यावर गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने तातडीने शोध घेत त्याचा जीव वाचवला.
मुंबई पोलिसांना २७ सप्टेंबर रोजी इंटरपोल कडून समीर (नावात बदल) हा २८ वर्षाचा मुलगा गुगलवर 'सुसाईड बेस्ट वे' असे शोधत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती क्राईम ब्रँच कक्ष ११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना देण्यात आली. अत्यंत संवेदनशील विषय असल्याने चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, फौजदार कांबळे, हवालदार सुर्वे, केणी, खताते आणि रावराणे यांनी मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच पोलिसी कौशल्याचा वापर करत मालाडच्या मालवणी परिसरातून राजस्थानचा रहिवासी असलेल्या समीरला शोधून काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा मिरा रोडला त्याच्या नातेवाईकाकडे राहायला आला होता. त्याची आई पूर्वीपासून मुंबईत राहत असून एका गुन्ह्याच्या प्रकरणात गेले दोन वर्ष ती कारागृहात आहे.
समीर एका ठिकाणी खाजगी नोकरी करत होता मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्याकडे नोकरीही नव्हती आणि कामही मिळत नव्हते. आईला जामीन मिळत नसल्याने तो अधिकच तणावात गेला आणि यामुळे गेल्या दोन दिवसापासून त्याच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार येत होता. समीर मोबाईलमध्ये गुगलवर आत्महत्या करण्याचे सोपे मार्ग शोधत होता. या दरम्यान त्याने एका वेबसाईटवर चॅटिंगही केले. मात्र वेळीच याची माहिती इंटरपोलला मिळाल्यानंतर त्यांनी ती मुंबई पोलिसांना दिली. त्यामुळे चव्हाण यांच्या पथकाने समीरला मालवणी परिसरातून शोधून कक्ष ११ च्या कार्यालयात आणत त्याची विचारपूस केली. इतकेच नव्हे तर त्याने आत्महत्या करू नये म्हणून त्याचे समुपदेशनही करण्यात आले.
पोलिसांशी बोलल्यावर आत्महत्येचा विचार त्याच्या मनातून निघाला आणि त्याचे मतपरिवर्तन झाले. पोलिसांनी समीरला चांगली नोकरी मिळावी यासाठी ही प्रयत्न सुरू करत त्याच्या चुलत भावाला बोलवून सुखरूपपणे त्याला त्यांच्या स्वाधीन केले. सध्या गणेशोत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रयत्नशील असताना एका तरुणाचा जीव त्यांनी वाचवल्याने वरिष्ठाकडून कक्ष ११ चे कौतुक करण्यात येत आहे.