Join us

मुंबईकरांना पावसाळ्यात घामाच्या धारा

By admin | Published: July 03, 2015 3:34 AM

जून महिन्यात पडलेल्या मुसळधार सरींनी मुंबापुरीला गारद केले असले तरीदेखील त्यानंतर पावसाने उघडीप घेतल्याने शहराचा पारा भलताच चढला आहे. मुंबईचे कमाल आणि किमान

मुंबई : जून महिन्यात पडलेल्या मुसळधार सरींनी मुंबापुरीला गारद केले असले तरीदेखील त्यानंतर पावसाने उघडीप घेतल्याने शहराचा पारा भलताच चढला आहे. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २७ अंशावर स्थिर असून, आर्द्रतेतील वाढीने येथील वातावरण उष्ण झाले आहे. शिवाय दिवसासह रात्रीच्या उकाड्यात वाढ झाल्याने बदलत्या वातावरणामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.मागील दहाएक दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातल्या पावसाने उघडीप घेतली आहे. कुठेतरी पावसाची एखादी सर पडत असली तरी एकंदरीत पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने २६ अंशावर घसरलेले कमाल तापमान थेट ३२ अंशावर पोहोचले आहे. शिवाय २४ अंशावर घसरलेले किमान तापमानही २८ अंशावर पोहोचले आहे. ५० टक्क्यांवर उतरलेली आर्द्रताही आता ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. मुंबईवरील पावसाचे ढगही दिसेनासे झाले आहेत. वातावरणात झालेल्या बदलाचा विपरीत परिणाम म्हणून गारवा कमी झाला असून, उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे. पुढील ७२ तास असेच वातावरण मुंबईत कायम राहील. (प्रतिनिधी)