पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने या अगोदरच घेतली आहे. त्याचबरोबर पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील जमिनीचा सातबारा सुध्दा सिडकोच्या नावावर झाला आहे. मात्र त्या बदल्यात पालिकेला अद्याप सिडकोने जमीन दिली नसून याबाबत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे मंगळवारी नगराध्यक्षांसह गेलेल्या शिष्टमंडळाने याबाबत सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारला. याबाबत लवकरच निर्णय घेवू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. कोपर येथे पनवेल नगरपालिकेने १९६० ला गटार योजनेकरिता ३२ एकर जागा संपादित केली होती. या ठिकाणी योजना काही प्रमाणात उभारण्यातही आली होती मात्र ती जास्त काळ चालू शकली नाही. त्यामुळे ही जमीन मिळावी याकरिता सिडको गेल्या अनेक वर्र्षांपासून प्रयत्न करीत आहे. सिडकोने या अगोदर पनवेल नगरपालिकेभोवती मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली. पालिकेची हद्द असलेले नवीनपनवेल, खांदा वसाहतही महामंडळाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पालिकेकडे आता जागाच शिल्लक राहिलेली नाही या कारणाने विकास कामे करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. पनवेल शहर त्याचबरोबर सिडकोच्या जागेत असलेल्या झोपडपट्ट्या हटविण्याकरिता त्याचे पुनर्वसन करणे क्र मप्राप्त आहे. याची पूर्णत: जबाबदारी पनवेल नगरपालिका घेत असून फक्त जागा सिडकोने द्यायची आहे. मात्र सिडकोने जागा पालिकेकडे हस्तांतरित केली नाही. तक्का येथे भूखंड सिडकोने फक्त देवू केला आहे प्रत्यक्षात कृती शून्य आहे. या संदर्भात वारंवार बैठका झाल्या मात्र सिडकोकडून फक्त आश्वासनांची खैरात करण्यात आली. कोपर येथे जागा देण्यास पालिकेने सातत्याने विरोध दर्शवला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश पारित करीत ही जागा विमानतळाकरिता देण्याचे आदेश पालिकेला दिले. मात्र सिडकोने या आदेशाला हरताळ फासला आहे.
विमानतळाची जागा सिडकोकडे वर्ग
By admin | Published: September 25, 2015 2:12 AM