Join us

महाविकास आघाडीचे जागावाटप अडले; मुंबईत ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 5:55 AM

मुंबईत उद्धवसेना २२ जागांसाठी आग्रही; काँग्रेसचा १७ जागांचा हट्ट.

मुंबई :मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांवर महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असून, उद्धवसेनेचा २० ते २२ जागांचा आग्रह आणि काँग्रेसने १५ ते १७ जागांचा हट्ट यावर आघाडीचे घोडे अडले आहे. यावरून सोमवारी झालेल्या बैठकीतही जागावाटपाचा तिढा सुटला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपांच्या बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे.

रविवारनंतर दुसऱ्या दिवशी, सोमवारीही वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, अस्लम शेख, भाई जगताप, ठाकरे गटाकडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत विशेषतः मुंबईतील विधानसभेच्या ३६ मतदारसंघांना प्राधान्य दिले. मुंबईच्या मतदारसंघातील जागावाटपावर निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील जागावाटपावर चर्चा होणार नसल्याचे समजते. २०१९च्या निवडणुकीत मुंबईत आघाडीतील ज्या पक्षांनी जागा जिंकल्या आहेत, त्या वगळता भाजपने जिंकलेल्या १६ जागांवर चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विशेषकरून मुंबईत ठाकरे गटाने तीन जागा जिंकल्याने त्यांनी विधानसभेसाठी २०-२२ जागांची मागणी केली आहे, तर काँग्रेस एका जागेच्या जोरावर किमान १५-१७ जागांसाठी आग्रही आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुंबईत सात जागांवर दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे काही मतदारसंघावर ठाकरे गट व काँग्रेसनेही दावा केल्याने जागावाटपाचा तिढा वाढला आहे. आगामी निवडणूक महानगरपालिकेची उद्धवसेनेबरोबर काँग्रेससाठीही महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकून मुंबई आपलीच आहे, हे दाखविण्याचा उद्धवसेनेचा प्रयत्न आहे. पालिका निवडणुकीपूर्वी हा प्रभाव त्यांना मतदारांवर बिंबवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी उद्धवसेना विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र जास्त जागा देण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे बैठकीत त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

टॅग्स :महाविकास आघाडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई