Join us

जागावाटप मेरिटनुसारच! काँग्रेसच्या बैठकीत सूर; जूनच्या जिल्हाध्यक्ष मेळाव्यात आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 7:04 AM

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोठा भाऊ कोण? यावरून महाविकास आघाडीत जुंपली असतानाच काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (दि. २३) पार पडली. आघाडीत तिन्ही पक्षांनी एकत्रच निवडणुकीला सामोरे जायचे असले तरी ज्या जागेवर काँग्रेस सक्षम आहे त्या जागा मिळविण्यासाठी काँग्रेसचा आग्रह असणार आहे. जागावाटपाचा निर्णय मेरीटनुसारच घेतला जाणार असल्याचा सूर या बैठकीत उमटला. यासाठी २ आणि ३ जूनला जिल्हाप्रमुखांची बैठक घेतल्यानंतर जागांसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. भाजपचा पराभव करणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागावाटप निश्चित केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.  

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

एकत्र लढणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो! - अजित पवारnमहाविकास आघाडीतील मतभेदानंतर मंगळवारी अचानक सूर बदलले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी १०० टक्के निवडणुका एकत्रच लढविणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, स्टॅम्प आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार.  nअशा प्रकारच्या चर्चा चालतात. एका पक्षातही वेगवेगळे विचार समोर येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील, असेही पवारांनी स्पष्ट केले. nआम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकार असतो. मविआची एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढू नका, असेही ते म्हणाले.

सर्व बाजूंचा विचार करणार : पटोलेजागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. २०१४, २०१९ आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. २ व ३ तारखेला काँग्रेस पक्ष प्रत्येक जागेचा आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेईल. महाराष्ट्र काँग्रेसच्या विचारांचे राज्य आहे. विदर्भातही काँग्रेसचा जनाधार वाढलेला आहे. मागील तीन वर्षांत आम्ही भाजपला मागे टाकत विजय संपादन केला आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करून जागावाटप होईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

‘मविआ’मध्ये आम्ही तिळे भाऊमहाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढवाव्यात आणि निवडून याव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. मागील वेळी २६ जागा लढलो असलो, तरी यावेळी मागच्या पेक्षा काँग्रेसची परिस्थिती अधिक चांगली आहे. त्यानुसारच जागा ठरतील. महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाही, आम्ही तिळे भाऊ, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कार्यकारिणीत अनेक ठरावही मंजूरमहाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत अनेक ठरावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कर्नाटकच्या विजयाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेली दुर्घटना आणि एमपीएससी परीक्षा प्रकरणी सरकारच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच राज्यातून महिला व मुली मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत असल्याप्रकरणीही राज्य सरकारचा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. 

टॅग्स :नाना पटोले