Join us

मुंबईत आजपासून प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट हाेणार बंधनकारक; उल्लंघन केल्यास कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 6:12 AM

सप्टेंबरमध्ये प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

मुंबई  : कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसा किंवा मागच्या बाजूला, गाडीत बसून बाहेरची गंमत पाहण्याची मजा औरच. मात्र, या मजेबरोबरच आता सीटबेल्टची सक्ती करण्यात आली आहे. आज, १ नोव्हेंबरपासून मुंबईतकारमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा नियम बंधनकारक असेल. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर बेल्टची व्यवस्था नाही, अशांना सीट बेल्ट बसविण्यासाठी पोलिसांनी दिलेली १५ दिवसांची मुदत सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली. 

सप्टेंबरमध्ये प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी मिस्त्री गाडीत मागच्या सीटवर बसले होते. या दुर्दैवी घटनेनंतर गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्टची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत १ नोव्हेंबरपासून हा नियम काटेकोरपणे अंमलात आणण्यात येणार आहे. तत्पूर्वी सीटबेल्ट बसविण्याचे निर्देश मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना दिले होते. 

टॅक्सीतील प्रवाशालाही केला जाईल दंड 

टॅक्सीमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नाही तर त्याचा दंड टॅक्सीचालकाला न करता प्रवाशाला केला जाईल, असे आश्वासन सहआयुक्तांनी दिले असल्याचे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रॉस यांनी सांगितले.

...तर कारवाई

मंगळवारपासून वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला नसेल तर ई-चलान कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.ओला, उबर यासारख्या ॲपवरील टॅक्सीचालकांनी पोलिसांच्या या सक्तीला विरोध केला नसला तरी काळी-पिवळी टॅक्सीमध्ये हे बेल्ट बसविण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ही सक्ती आम्हाला नसल्याचे टॅक्सीचालक म्हणत असले तरी कारवाई सरसकट सर्वांवर केली जाईल, असे पोलिसांनी  म्हटले आहे. 

टॅग्स :काररस्ते सुरक्षामुंबई