मुंबई : कार चालविताना सीट बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजतो. तो न वाजण्याची यंत्रणा म्हणून ‘सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लीप’ विकल्या जात असून, त्याद्वारे कारचालकाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अनधिकृत अलार्म स्टॉपर क्लीप विक्रीबाबत संबंधित यंत्रणाकडून वेळोवेळी कारचालकांना आवाहन करण्यात येते आहे.
कारमधून प्रवास करताना सुरक्षेसाठी गाडीतील सर्वांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक व कायद्याच्या दृष्टीने बंधनकारक आहे. काही वर्षांपासून उत्पादकांनी कार उत्पादन करताना सीट बेल्ट लावला नाही, तर सूचना करणाऱ्या अलार्मची सुविधा प्रत्येक कारमध्ये देण्यात आली आहे. चालक बेल्ट लावत नाही, तोपर्यंत हा ‘बीप बीप’ अलार्म वाजतच राहतो.
सीटबेल्ट अलार्म स्टॉपर ऑनलाईन स्वस्तात किरकोळ बाजारात व ऑनलाइन साइटवरही हे अलार्म स्टॉपर उपलब्ध असते. त्यावर विविध प्रकारच्या सवलतीही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याद्वारे कारचालकासह प्रवाशांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरू आहे.
‘अलार्म स्टॉपर’ची विक्री सर्रास सुरू सीट बेल्ट आवश्यक असताना, काहींना तो लावायचा नसतो. बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजत राहतो. तो वाजू नये, म्हणून ‘अलार्म स्टॉपर’ बाजारात आले आहेत. त्याची अनधिकृत विक्री सर्रास सुरू आहे.