मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधील तिसऱ्या फेरीतील अखेरची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली असून, मुंबई महानगर क्षेत्रातील बहुतांश नामंकित महाविद्यालयांच्या जागा या फेरीत फुल्ल झाल्या आहेत. अनेक नामांकित महाविद्यालयातील कट ऑफमध्ये मागील गुणवत्ता यादीपेक्षा ०.२ ते अगदी ४ टक्क्यांपर्यंतची वाढ झालेली आहे. ही वाढ विशेषत: कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी जास्त दिसून आली असून, एक ते दोन ठिकाणी वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी आहे, तर इतर महाविद्यालयांत मागील कट ऑफपेक्षा १ ते २ टक्क्यांची घसरण गुणवत्ता यादीत झालेली आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीतही कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचा कट ऑफ सर्वसाधारणपणे ८५ ते ९० टक्क्यांच्या वरच राहिल्याने ८० टक्के आणि त्याहून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना आता विशेष फेरीची वाट पाहावी लागणार आहे.
यंदाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये एचआर, रुईया, एनएम पोदार महाविद्यालयातील जागा फुल्ल झाल्या आहेत. एचआर व पोदार महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कट ऑफ अनुक्रमे ९३ टक्के आणि ९२.८ टक्के असून, या यादीसाठी जागाच उरल्या नाहीत, तर वझे- केळकर महाविद्यालयाच्याही वाणिज्य व विज्ञान शाखेच्या जागा या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध नव्हत्या. दुसऱ्या गुणवत्ता यादीतील त्यांचा वाणिज्य व विज्ञानाचा कट ऑफ अनुक्रमे ९१.६ आणि ९३ टक्के इतका होता. एनएम महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्याही जागा तिसऱ्या यादीसाठी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून आली.
बहुतांश महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये तिसऱ्या गुणवत्ता यादीत वाढ दिसून आली आहे. उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कटऑफ मध्ये २ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईतील सेंट झेविअर्सच्या कला व विज्ञान दोन्ही शाखांत वाढ झाली असून, कला शाखेच्या कट ऑफमध्ये १.२ टक्क्यांची, तर विज्ञान शाखेत जयहिंद महाविद्यालय, केसी महाविद्यालय, साठ्ये या महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये वाढ दिसून आली आहे. इतर महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये १ ते २ टक्क्यांची घसरण असल्यामुळे ८० ते ८५ टक्क्यांहून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना संचालनालयाकडून जाहीर होणाऱ्या तिसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे.
-------------
नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ
महाविद्यालय - कला -वाणिज्य - विज्ञान ( (सर्व आकडेवारी टक्क्यांमध्ये )
एचआर - ०- ०- ०
केसी - ८७- ९०. ८- ८८. ४
जयहिंद - ९१-९२- ८८. २
सेंट झेविअर्स - ९५. २- ०- ८९. ८
रुईया - ९२. २ - ०- ०
पोदार - ०-०-०
रूपारेल - ९१- ९०. ४- ९१
साठ्ये - ७८. ६ - ८८. ८ - ८८. ६
डहाणूकर - ०- ९०- ०
मिठीबाई - ८६. ४ - ९१. ४ - ८६. ८
एन. एम. - ० - ०- ०
वझे केळकर - ९०. ४ - ०- ०
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स - ०-९१. ६ - ०
सीएचएम - ७४. ८ - ७९. ८ - ८६.२