Join us

जागा २ हजार, इच्छुक २५ हजार; एअर इंडियातील नोकरीसाठी झुंबड; चेंगराचेंगरीसदृश स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 6:18 AM

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस या कंपनीमध्ये लोडर आणि दुरुस्तीसाठी  कलिना येथील सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथील गेट क्रमांक पाचच्या बाहेर  भरती प्रक्रिया होणार होती.

मुंबई : एअर इंडिया कंपनीमध्ये लोडर, दुरुस्ती-देखभाल अशा कामांच्या २२१६ जागांसाठी तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त तरुणांनी एअर इंडिया कंपनीचे कार्यालय गाठल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी १० वाजता वॉक इन इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेसाठी अवघ्या तीन तासांत २५ हजारांपेक्षा जास्त तरुणांनी गर्दी केल्याने चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर उमेदवारांनी केवळ बायोडेटा ठेवून जावा. त्यांना नंतर निर्णय कळविण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने केल्यानंतर ही गर्दी पांगली.

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस या कंपनीमध्ये लोडर आणि दुरुस्तीसाठी  कलिना येथील सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथील गेट क्रमांक पाचच्या बाहेर  भरती प्रक्रिया होणार होती. विमानात सामान चढविणे आणि उतरविणे किंवा विमानाची दुरुस्ती-देखभाल असे या कामाचे स्वरूप असून, याकरिता केवळ १२ वी उत्तीर्ण अशी अट आहे. या पदाकरिता महिन्याकाठी कमाल ३० हजार रुपयांचे वेतन मिळू शकते. त्यामुळे अनेक तरुणांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली. बीबीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा प्रथमेश्वर नावाचा तरुण थेट बुलढाण्याहून आला होता. गर्दीतील अनेक तरुण बीए उत्तीर्ण झाल्याचीही माहिती आहे. तरुणांनी केलेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान, एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्डचे सरचिटणीस जॉर्ज अब्राहम यांनी ही भरती प्रक्रिया सदोषरित्या राबविल्याची टीका केली आहे. काही तरुणांनी सोबत डिमांड ड्राफ्टही आणला होता. मात्र, कुणीही पैसे देऊ नये, केवळ बायोडेटा जमा करून त्यांना जाण्यास सांगण्यात आल्याचेही अब्राहम यांनी सांगितले.

टॅग्स :एअर इंडियानोकरी