Join us

‘मरे’वर दुसरी टू बाय टू लोकल

By admin | Published: February 06, 2016 3:38 AM

गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून लोकल डब्यातील आसन व्यवस्थेत बदल केलेली पहिली लोकल नुकतीच चालविण्यात आली होती

मुंबई : गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून लोकल डब्यातील आसन व्यवस्थेत बदल केलेली पहिली लोकल नुकतीच चालविण्यात आली होती. यानंतर आता मध्य रेल्वेकडून टू बाय टू प्रकारातील नवीन लोकल शुक्रवारपासून चालविण्यात आली. गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपाय शोधले जात आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या निर्देशानुसार मध्य रेल्वेने अपघात आढावा समितीही स्थापन केली आहे.यात रेल्वे अधिकारी, खासदार, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी असून त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार लोकल डब्यातील आसन व्यवस्था बदलण्यात येत आहे. आसन व्यवस्था बदलून मेट्रो सारखी पहिली लोकल मध्य रेल्वेकडून नुकतीच चालविण्यात आल्यानंतर गुरुवारी टू बाय टू आसन व्यवस्था असलेली नवीन लोकल चालविण्यात आली. गुरुवारी प्रायोगिक तत्वावर लोकल चालविल्यानंतर शुक्रवारी ती सेवेत दाखल करण्यात आली. या लोकलमध्ये गार्डच्या दिशेने असणाऱ्या ४, ६, ९ आणि १0 व्या डब्यात अशाप्रकारची आसनव्यवस्था करण्यात आली असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्याने सांगितले. बदलण्यात आलेल्या आसनव्यवस्थेमुळे डब्यातील प्रवासी क्षमता ५९३ ऐवजी ६५१ इतकी झाली आहे, तर या लोकलमधील दुसऱ्या व चौथ्या डब्यात मेट्रोसारखी आसनव्यवस्था आहे. (प्रतिनिधी)