Join us

दुसरा मंत्रीमंडळ विस्तार... शिंदे गटाला हवीत ग्रामीण भागाशी निगडित खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 5:58 AM

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अस्तित्वात आलेल्या सरकारचा पहिला विस्तार ऑगस्ट महिन्यात झाला

दीपक भातुसे  

मुंबई : एकनाथ शिंदे-भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळ खातेवाटपात ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडित एकही खाते वाट्याला न आल्याने शिंदे गटातील मंत्री असमाधानी असून ग्रामीण भागाशी निगडित एक-दोन खाती मिळावीत यासाठी आता शिंदे गटाकडून आग्रह धरला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे असलेल्या ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा या खात्यांपैकी एक-दोन खाती शिंदे गटाला मिळावीत, अशी आग्रही मागणी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केली असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी या मंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.  

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अस्तित्वात आलेल्या सरकारचा पहिला विस्तार ऑगस्ट महिन्यात झाला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये खातेवाटप करण्यात आले. यात भाजपच्या वाट्याला ग्रामीण भागाशी निगडित ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पशुसंवर्धन व दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय अशी महत्त्वाची खाती मिळाली. तर शिंदे गटाच्या वाट्याला ग्रामीण भागाशी निगडित कृषी तसेच रोजगार हमी व फलोत्पादन ही खाती आली. शिंदे गटाच्या वाट्याला आलेली ग्रामीण भागाशी निगडित खाती थेट गावच्या विकासाशी निगडित नाहीत. कृषी खात्यातील योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, तर रोजगार हमी व फलोत्पादन या खात्यासाठी निधी कमी मिळतो. त्यामुळेच थेट गावच्या विकासासाठी जादा निधी मिळेल शा खात्यांसाठी शिंदे गटातील मंत्री आग्रही आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करावी, अशी मागणी शिंदे गटातील मंत्र्यांनी केल्याचे समजते. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बुधवारी रात्री भेट घेतली. या भेटीत याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.  

मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा शिंदे गट आणि भाजपमधील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. पहिल्या विस्तारात स्थान न मिळालेल्या मात्र मंत्रिपदाचा शब्द दिलेले शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याने अस्वस्थ आहेत. पहिल्या विस्तारानंतर नाराज असलेल्या आमदारांना सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला आहे. मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी विस्तार होत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढत असून आता नवरात्रीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेमंत्री