दुसऱ्या कॅप फेरीअखेर ६५ हजार प्रवेश
By admin | Published: July 21, 2015 01:51 AM2015-07-21T01:51:29+5:302015-07-21T09:09:45+5:30
अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशातील दोन कॅप राऊंडनंतर सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर सोमवारी समुपदेशन पद्धतीने
मुंबई : अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशातील दोन कॅप राऊंडनंतर सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर सोमवारी समुपदेशन पद्धतीने राज्यातील ९ केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत ६४१ प्रवेश निश्चित झाले होते.
मंगळवारी समुपदेशन पद्धतीने होणाऱ्या प्रवेशाचा दुसरा दिवस आहे. याआधी औरंगाबादमध्ये एकच केंद्र असल्याने विद्यार्थ्यांची पंचाईत होत होती. त्यासाठी सरकारने यंदा राज्यात एकूण १० समुपदेशन केंद्रांची उभारणी केली आहे. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेड, सांगली या केंद्रांचा समावेश आहे. समुपदेशन पद्धतीने होणाऱ्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी तंत्र संचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. पुढील पाच दिवस प्रवेश फेरी होणार आहे.
दरम्यान, १ लाख ७० हजार जागांसाठी केवळ १ लाख ७ हजार १४७ अर्ज आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार होत्या. बारावीच्या विक्रमी निकालामुळे रिक्त पदांची संख्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र दाखल अर्जांमधील केवळ ६५ हजार जागा पहिल्या दोन कॅप राऊंडमध्ये भरल्याने रिक्त जागांचा आकडा आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी शेवटच्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी संचालनालयाच्या संकेतस्थळावर मिळणाऱ्या प्रवेश पत्रासह १० हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आणणे आवश्यक आहे. संबंधित डिमांड ड्राफ्ट संचालक, तंत्रशिक्षण यांच्या नावाने काढणे अपेक्षित आहे.