मुंबई : मुंबईत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांच्या टप्प्यात असल्याची नोंद आहे. शहर, उपनगरांत दिवसभरात पाच हजार ५४२ रुग्ण आणि ६४ मृत्यू झाले आहेत. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख २७ हजार ६५१ झाली असून बळींचा आकडा १२ हजार ७८३ आहे. रविवारी ८ हजार ४८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ५ लाख ३७ हजार ७११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत सध्या ७४ हजार ४० रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८६ टक्के झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५८ दिवसांवर आला आहे. १८ ते २४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर १.१७ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत दिवसभरात ४० हजार १९८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत; तर एकूण ५२ लाख ४३ हजार ७३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ११४ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर एक हजार १६६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.
रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
मुंबई महानगरपालिकेने २२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शहरात ८ हजार ९० कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली; तर, याच दिवशी ७,४१० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यावेळी रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा ५० दिवस इतका होता. तर, २३ एप्रिल रोजी पालिकेच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ७ हजार २२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर त्याहीपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढून तब्बल ९,५४१ वर पोहोचली. ज्यामुळे आता एकूण कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्णवाढ दुपटीचा दर ५२ दिवसांवर पोहोचला. कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे हे आकडे पाहता मुंबईत हेच चित्र कायम राहिल्यास पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणात आणण्यास यश मिळेल.
दिनांक - बरे होणाऱ्यांची संख्या - नवीन रुग्ण
२२ एप्रिल - ८ हजार,०९० - ७ हजार ४१०
२३ एप्रिल - ९ हजार ५४१ - ७ हजार २२१
२४ एप्रिल - ८ हजार ५४९ - ५ हजार ८८८
२५ एप्रिल – ८ हजार ४८७ – ५ हजार ५४२