मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक ३,०६२
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या लाटेचा दुसरा फेरा राज्याच्या डोक्यावर घोंगावत असून, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५,६८१ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत, तर मुंबईने दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत ३,०६२ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यातील गेल्या सहा दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या एक लाख नऊ हजार १७८ एवढी झाली आहे. राज्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाख ७७ हजार ५६० इतकी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने पुन्हा वाढली आहेत.
राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून दररोज रुग्णसंख्या वाढू लागली. काही ठिकाणी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असले तरी त्यामुळे संपर्कातून पसरणाऱ्या कोरोनाला अटकाव करणे शक्य झालेले नाही. शुक्रवारी राज्यात १४,४०० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आता राज्यात ८ लाख ६७ हजार रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर ७,८४८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्याचा मृत्युदर २.२० एवढा आहे. शुक्रवारी एकूण ७० मृत्यूंची नोंद झाली आहे.
आकडेवारी
मुंबई - ३,०६२
पुणे - २,८७२
नागपूर - २,६१७
पिंपरी-चिंचवड - १,३२४
औरंगाबाद - १,३१३
नाशिक - ९३९
जळगाव-ग्रामीण - ७६४
कल्याण-डोंबिवली - ६४४
ठाणे - ५५२
नाशिक ग्रामीण - ५१४