लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील जम्बो कोरोना केंद्रासह पालिका, खासगी रुग्णालयांत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सोमवारी सुरू झाले. मात्र, दुसऱ्या दिवशीही शहर, उपनगरातील वांद्रे, नेस्को जम्बो कोरोना केंद्रांवर कोरोनाविषयक नियमांना अंतर देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले, शिवाय माहितीची अभाव असल्याने दुसऱ्या दिवशीही लसीकरण केंद्रावर गोंधळाची स्थिती होती.
वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजारांच्या रुग्णांना लसीकरण करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शहरात प्रचंड गोंधळ उडाला. खासगी केंद्रात लसीकरण प्रक्रियेला आणखी विलंब होत असल्याचे दिसून आले. ही स्थिती दुसऱ्या दिवशीही कायम हाेती. शासकीय केंद्रावर कुठे कोविन अॅपमधील तांत्रिक दोष, तर कुठे इतर कारणांमुळे तासन्तास वृद्ध ताटकळत राहिले. सर्वत्र सुरक्षित अंतराच्या नियमाचा भंग झाला. केंद्रांवर वृद्धांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. त्या तुलनेत सुविधा नव्हत्या. लसीकरणाच्या नोंदी होत नसल्याने अधिकारी गोंधळातच होते. सुमारे तासभराने काही ठिकाणी नोंदणी आणि त्यामुळे लसीकरणही सुरू झाले.
बीकेसी येथील केंद्राचा व्हिडिओ व्हायरलnलसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून मंगळवारी बीकेसी येथील लसीकरण केंद्रात गोंधळ पाहावयास मिळाला. सकाळी लाभार्थींची प्रचंड गर्दी होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नसल्याने गोंधळ उडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. अखेर यावर बीकेसी अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी भाष्य केले. लसीकरणात अजिबात गोंधळ नसून सुरुवातीच्या तासात थोडासा गोंधळ झाला होता. मात्र, लगेचच कोविन ॲपमधील गोंधळ दूर करण्यात आला. तसेच इतर उणीवही दूर केल्या. केंद्रात लसीकरण सकाळी ११.२० वाजता नियमित करण्यात आले. सर्व स्थिती नियंत्रणात असल्याचे डॉ. डेरे सांगितले.