संपामुळे नागरिकांचे हाल, सरकारी कर्मचारी संपाचा दुसरा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:03 AM2018-08-09T05:03:59+5:302018-08-09T05:04:17+5:30
सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सलग दुसºया दिवशी सुरू असलेल्या संपामुळे उपचारानंतर डिस्चार्जसाठी रुग्णांना वणवण करावी लागत असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. त्यात गोदी व बंदर कामगारांनीही संपाला पाठिंबा दिल्याने, संपाची धार अधिक तीव्र झाली आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनने बुधवारी संपाला जाहिर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अॅड. एस. के. शेट्ये आणि सरचिटणीस सुधाकर अपराज यांनी दिली. दरम्यान, कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे कार्यालयातील कारकुनी काम बंद असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचीही फरफट होऊ लागली आहे. शासकीय रुग्णालयातील परिचारिका, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारी संपावर गेल्यामुळे, रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवू लागला आहे. रुग्णालयामध्ये मनुष्यबळ नसल्याने काही शस्त्रक्रिया रद्दही करण्यात आल्या. परिणामी, तात्पुरती वैद्यकीय सुविधा रुग्णालयामध्ये पुरविल्या जात होत्या. सेंट जॉर्ज रुग्णालयात बुधवारी रुग्णांची संख्या कमी होती. कर्मचारी संपामुळे डॉक्टरांवर जास्तीचा भार पडल्याचे दिसत होते. रुग्णालयातील छोट्या-मोठ्या कामांसाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करत होते. मात्र, आपत्कालीन विभाग सुरू होता.
दिवसभरात १२ शस्त्रक्रिया
जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले की, बुधवारी ओपीडीमध्ये २,९१७ रुग्ण दाखल झाले होते. आपत्कालीन विभागात दुपारी ४ वाजेनंतर ४९ रुग्ण दाखल केले गेले. दिवसभरात १२ शस्त्रक्रिया तर चार महिलांची प्रसूती करण्यात आली.
रुग्णसंख्या कमी
कामा रुग्णालयातदेखील बुधवारी रुग्णांची संख्या कमी दिसून आली. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजश्री कटके यांनी सांगितले की, ओपीडीत १२१ रुग्ण दाखल झाले.
शस्त्रक्रिया आणि महिलांची प्रसूती झाली नाही.
अकरावी प्रवेश प्रक्रियेला फटका
अकरावी प्रवेशाची चौथी यादी मंगळवारी जाहीर झाली असून मुंबई विभागातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. प्रवेश निश्चितीसाठी दोन दिवसांची मुदत आहे. मात्र, मुंबई, ठाणे येथील कनिष्ठ महाविद्यालयातील बहुतांश शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झाल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. गुरुवारी मराठा क्रांती मोर्चामुळे महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची पंचाईत होईल.
>जेवणही मिळणे कठीण
कामा रुग्णालयात गेल्या नऊ दिवसांपासून उपचारासाठी दाखल आहे. पूर्णपणे बरा झाल्यावरही रुग्णालयात कर्मचारी नसल्यामुळे डिस्चार्च मिळेनासा झाला आहे. येथील उपस्थित असलेल्या कर्मचाºयांच्या मागे लागून डिस्चार्च देण्यासाठी विनंती करत आहे. मात्र, संपामुळे आता डिस्चार्च मिळू शकणार नसून, थेट शनिवारी पैसे भरून डिस्चार्च मिळेल, असे सांगण्यात आले. संपामुळे रुग्णालयात कचºयाचे साम्राज्य पसरू लागले आहे, तसेच कोणतीही वस्तू आणि जेवण वेळेवर मिळत नाही. परिणामी, रुग्णांचे खूप हाल होत आहेत, अशी माहिती कामा रुग्णालयातील रुग्ण शशी सिंग यांनी दिली.