मुंबई : यंदा दसरा आणि दिवाळी दोनदा आली आहे. काही दिवसांपूर्वी विजयादशमी झाली, तर निकालावेळी २४ आॅक्टोबरला विजयादशमीसोबत दिवाळीसुद्धा आहे. त्यानंतर महिनाभरात अयोध्येतील दिवाळी आहे. ही प्रभू रामचंद्रांची दिवाळी असणार आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयाचा नारा देताना शुक्रवारी हिंदुत्वाचा नारा दिला.
बीकेसी येथे महायुतीच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात केवळ महायुतीचे वातावरण आहे. या निवडणुकीत राजकीय विरोधकच नाहीत. काँग्रेसची अवस्था शेंडा आणि बुडखा नसल्यासारखी झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये जे काही उरलेसुरलेले लोक आहेत, तेही विधानसभा निवडणुकीनंतर इकडे येतील, अशी चिन्हे आहेत.
राजकीय विरोधक नसले, तरी महायुतीसमोर आव्हान मोठे आहे. ते लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आहे. पाच वर्षांत युतीच्या सरकारने लोकांचे प्रश्न सोडविण्याचा मोठे काम केले. तेव्हा काही विषयांवर शिवसेनेने टीकाही केली, पण तो विषय लोकसभेच्या आधीच संपला. पाच वर्षांतील कामात शिवसेनेचाही सिंहाचा वाटा असल्याचे ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.
शिवसेना आणि भाजपच्या जाहीरनाम्याबाबत ते म्हणाले की, शिवसेनेने १० रुपयांत सकस थाळी आणि एक रुपयात आरोग्य चाचण्यांचे आश्वासन दिले. भाजपनेही गरिबांना घरे देण्याचे आश्वासन दिले, पण भाजपच्या जाहीरमान्यातील मला आवडलेली बाब म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याचे आश्वासन. सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न देऊन आपण काही त्यांना मोठेपणा देत नाही आहोत. असे महान नेते महाराष्ट्रात होऊन गेले, याची ओळख जगाला करून देण्यासाठी भारतरत्न देणे आवश्यक आहे. सावरकर क्रांतिकारक होतेच, महात्मा फुलेंनीसुद्धा विचारांची क्रांती केल्याचे ठाकरे म्हणाले.सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते थकल्याच्या विधानाचा संदर्भ देत, उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस आघाडीचे नेते थकले, कारण त्यांनी इतकी वर्षे केवळ ‘खा-खा खाण्याचे’ काम केले. आता न खाणाऱ्यांचे सरकार आले आहेत, म्हणूनच आघाडीचे नेते थकले आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेस नेत्यांसमोर आदराने मान झुकायची. आताच्या काँग्रेस नेत्यांना पाहिले की शरमेने मान खाली जाते. स्वातंत्र्याचा, विकासाचा विचार गेला आणि त्या ठिकाणी फक्त सत्तेचा विकार आला. सत्ताभक्षक नेत्यांमुळेच काँग्रेस आज जमीनदोस्त झाल्याची टीका ठाकरे यांनी केली.
या वेळी रामदास आठवले, विनोद तावडे, नीलम गोºहे आणि अतुल भातखळकर आदी नेत्यांचीही भाषणे झाली.