लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शहर-उपनगरातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे, मात्र हे लाभार्थी दुसरा डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. परिणामी, दुसऱ्या डोसला अधिक विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत असताना या डोसला विलंब झाल्यास हरकत नाही, त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, लसीचा पहिला डोस इम्युन सिस्टीम तयार करतो आणि विषाणूविरोधात प्रतिपिंड तयार करायाला सुरुवात करतो. अशा परिस्थितीत या प्रक्रियेला जेवढा अधिक वेळ लागेल तेवढी चांगली प्रतिक्रिया दुसऱ्या डोसमधून मिळते. लसीच्या दोन डोसमधील जास्त अंतर हे सर्वच लसींच्या बाबतीत फायदेशीर ठरते.
लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे हे खरे आहे. मात्र कोणत्याही कारणास्तव दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास घाबरून जाऊ नये. एखाद आठवडा वगैरे उशीर झाल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे लाभार्थ्यांनी संयम राखावा. केंद्राकडे सातत्याने लसींच्या साठ्याचा पुरवठा नियमित होण्यासाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे, याची लवकरच अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
कोविशिल्डचा तुटवडा अधिक
मुंबई पालिकेकडे कोविशिल्ड ही लस अधिक आहे. कोव्हॅक्सिन या लसींचा साठा मर्यादित असतो, त्यामुळे या लसीच्या डोसचा तुटवडा सातत्याने जाणवतो. तर स्पुतनिक ही लस पालिकेकडे नाही. दरम्यान, पालिकेच्या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक खंड हा कोविशिल्ड लसीचा अभाव असल्याने येत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
कोविशिल्डकोव्हॅक्सिन स्पुतनिक
एकूण ७९७११६७ ६६३५९३ २६४६४
पहिला डोस ६००५६६९ ४२८६२८ १५२९९
दुसरा डोस १९६५४९८ २३४९५५ १११६५