Join us

अनिल देशमुखांकडे ईडीचे दुसऱ्यांदा छापे; स्वीय सहायक ताब्यात, दस्तावेज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 7:40 AM

मुंबईत ईडीची चमू सकाळी ७ वाजता देशमुख यांच्या वरळीतील ‘सुखदा’ निवासस्थानी पोहोचली.

मुंबई/नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित १०० कोटी वसुली आरोपप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी शुक्रवारी दुसऱ्यांदा छापे मारले. दोन्ही घरांची साडेनऊ तास झाडाझडती घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली. देशमुखांचे खासगी सहायक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या निवासस्थानीही छापे मारत त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

मुंबईत ईडीची चमू सकाळी ७ वाजता देशमुख यांच्या वरळीतील ‘सुखदा’ निवासस्थानी पोहोचली. या वेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. त्यानंतर ९.२० च्या सुमारास राजीनामा दिल्यानंतरही देशमुख राहात असलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय बंगल्यात ईडीचे पथक दाखल झाले. या वेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यात उपस्थित होते. 

या गोष्टी आम्हाला  नव्या नाहीत - पवार

अनिल देशमुखांबाबत जे काही होत आहे, त्या गोष्टी आम्हाला नव्या नाहीत. मागे त्यांच्या चिरंजीवांच्या उद्योगावरही केंद्र सरकारने अशीच ‘प्रेमाची नजर’ टाकली होती. त्यातून त्यांना  काहीच मिळाले नाही, अशी माझी माहिती आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली.

‘दूध का दूध, पानी का पानी’ होईलच : देशमुख

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवल्याने परमबीरसिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्याचे ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाल्याशिवाय राहणार नाही. मी चौकशीस संपूर्ण सहकार्य केले आणि पुढील काळातही करू, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

टॅग्स :अनिल देशमुखअंमलबजावणी संचालनालय