महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज बुधवार दिनांक १५ मे २०२४ रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी दुसरी महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली. पहाटे ३ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली.
आधी बसवलेल्या पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतरावर ही तुळई बसविणे आव्हानात्मक होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे, महानगरपालिका उपआयुक्त चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांच्यासह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता प्रकल्प स्थळी उपस्थित होते.
आज स्थापन केलेली तुळई ही नरिमन पाईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. ही तुळई अडीच हजार मेट्रीक टन वजनाची असून १४३ मीटर लांब, ३१.७ मीटर रुंद आणि ३१ मीटर उंच आहे. उर्वरित कामे पूर्ण करून लवकरच मुंबई किनारी रस्त्याचा पुढील टप्पा सुरू होईल.