मुंबई : यंदा देशात रेकॉर्ड ब्रेक मान्सूनची नोंद होत आहे. स्कायमेटच्या दाव्यानुसार, ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी ऑगस्ट महिन्यात २६.६ टक्के एवढया अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ४७ वर्षांशी तुलना करता ऑगस्ट महिन्यात यावर्षी देशाने दुस-यांदा सर्वाधिक पाऊस पाहिला आहे. तत्पूर्वी १९७३ साली ऑगस्ट महिन्यात २७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली होती.
जुन आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात मान्सून भरभरून पडला आहे. जुन आणि जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची ही कसर ऑगस्ट महिन्याने भरून काढली आहे. कसर भरून काढतानाच दमदार कोसळलेल्या पावसाने मान्सूनचे गणितच बदलून टाकले असून, मान्सून सर्व साधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस देत आपली रजा घेईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. ऑगस्ट महिन्यातील २५ दिवस सर्व साधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस कोसळला. १० दिवस सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक पाऊस कोसळला. २१ ऑगस्ट रोजी ९७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे.
जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने मान्सूनमधील सर्वात महत्त्वाचे महिने आहेत. संपुर्ण मान्सून हंगामातील ६५ टक्के पाऊस या दोन महिन्यात कोसळतो. गेल्या १०० वर्षांचा विचार करता ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस १९२६ साली नोंदविण्यात आला होता. तेव्हा ३३.७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर १० वेळा सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला.
------------------
वर्ष मान्सून (सरीसरीच्या तुलनेत अधिक पाऊस टक्क्यांत. स्त्रोत : स्कायमेट)१९२६-३३.७१९३३-२८.२१९४४-२२.९१९४७-२२.३१९५५-२५.५१९६३-२५.११९७०-२३.५१९७३-२७१९८३-२१.२२०२०-२६.६