मुंबई - विधानसभेसाठी युती, आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरू असताना छोट्या छोट्या पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. एमआयएमने दोन याद्या जाहीर केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आता, आम आदमी पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या आठ जागांवर उमेदवारी घोषित केल्यानंतर आपने 7 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
आम आदमी पक्षाने 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये, ब्रम्हपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरी पूर्वसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरूडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वती मतदारसंघातून संदीप सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यानंतर, आपकडून आज आणखी 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मराठवाड्यातील जालना मतदारसंघातून कैलास फुलारी, ठाण्यातील मीररोड मतदारसंघातून नरेंद्र भांबवानी, पुण्याच्या शिवाजी नगर मतदारसंघातून मुकुंद किर्दत, वडगावशेरी मधून गणेश धमाले, मध्य सोलापूर येथून अॅड खतिब वकिल, नवापुर मतदारसंघातून डॉ. सुनिल गावित आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघातून डॉ. अल्तामाश फैजी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.