अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 07:08 AM2024-07-10T07:08:00+5:302024-07-10T07:08:13+5:30
पहिल्या यादीत ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार? आणखी 'कट ऑफ' किती गुणांनी खाली येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या यादीत बहुतांश मोठ्या महाविद्यालयांचा 'कट ऑफ' ९० टक्क्यांच्या वर असल्याने दुसऱ्या यादीत 'कट ऑफ' किती खाली उतरतो, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष असणार आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली यादी २७ जूनला जाहीर झाली होती. यंदा मुंबईतून उत्तीर्ण झालेले दोन लाख ७४ हजार ५६७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले होते. यापैकी एक लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. मात्र, ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती केली. त्यातील नऊ हजार ०२० विद्यार्थ्यांनी कला, ३५ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि ३१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली.
पहिल्या यादीनंतर प्रवेशाची स्थिती
• महाविद्यालये - १,०४६
• एकूण जागा - ४,००,३१५
• प्रवेशासाठी अर्ज केलेले विद्यार्थी - २,७४,१३४
• कोट्यासह प्रवेश निश्चिती - ७६,५७७
• रिकाम्या जागा - ३,२३,७३८
• प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थी - १,९७,५५७
महाविद्यालयांची पहिली कट ऑफ यादी
कला शाखा: सेंट झेविअर्स (९३.४), रुईया (९२.२), वझे-केळकर (८८.४), बिर्ला (८६.८) आणि रुपारेल (८५.८).
वाणिज्य शाखा : पोदार (९४.४), वझे-केळकर (९२.४), एमसीसी (९२), केसी (९१.४).
विज्ञान शाखा : फादर अॅग्नल (९३.८), रूईया (९३.४), बिर्ला (९३), वझे- केळकर (९२.८)