मुंबई - भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी अखेर भाजपला जय श्रीराम करत आज शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. यावेळी, उद्धव ठाकरेंनीशिवसेना उबाठा पक्षाच्या ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये, कल्याणमधून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी महिला उमेदवाराला मैदानात उतरवले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जळगाव, हातकणंगले, कल्याण आणि पालघर या ४ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये, वैशाली दरेकर यांना कल्याणमधून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कल्याणमध्ये शिवसेनेची रणरागिणी लोकसभेच्या रणांगणात उतरली आहे. दरम्यान, उन्मेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. जळगावमधून किरण पवार यांना शिवसेना उबाठा पक्षाने तिकीट दिलं आहे. त्यासोबतच, हातकणंगले मतदारसंघातून सत्यजीत पाटील यांना मैदानात उतरवले आहे. राजू शेट्टींच्या विरोधात आता महाविकास आघाडीचा उमेदवार येथे कार्यरत असणार आहे. तर, पालघरमधून शिवसेनेनं भारती कामडी यांना तिकीट दिलं आहे. दुसऱ्या यादीतील ४ उमेदवारांपैकी २ उमेदवार ह्या महिला असून कल्याणच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. महायुतीकडून पुन्हा एकदा त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यत आहे. भाजपा आणि शिवेसना यांच्यात या जागेवरुन अद्यापही चर्चा सुरूच आहे. भाजपाही ह्या जागेसाठी आग्रही आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट श्रीकांत शिंदेच्या नावावर ठाम असल्याचे दिसून येते. त्यामुळे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंविरुद्ध वैशाली दरेकर यांच्यात लढत होऊ शकते.
कोण आहेत वैशाली दरेकर
वैशाली दरेकर ह्या कल्याण डोबिंबवली महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या आहेत. मनसेतून त्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. वैशाली दरेकरांनी २००९ मध्ये मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, त्यांना १ लाख २ हजार मतं मिळाली होती. मात्र, त्यानंतर केडीएमसी महापलिका निवडणुकीत दरेकर यांना प्रभाग आरक्षण आणि पुनरर्चनेमुळे उमेदवारी मिळाली नव्हती. त्यावेळी त्यांना पूनर्वसनाचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं होतं. मात्र, ते आश्वासन पूर्ण न केल्याने वैशाली दरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.