मुंबई : कोरोनामुळे गतवर्षी अवयवदानाच्या प्रक्रियेत घट झाली होती. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मेंदूमृत झाल्याने दोन कुटुंबीयांनी अवयवदान केले आहे. मुलूंड येथील खासगी रुग्णालयात १३ जानेवारीला मुंबईतील दुसरे यशस्वी अवयवदान झाले. मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचे सर्वच अवयव दान करण्याची तयारी कुटुंबीयांनी दर्शवली. मात्र, फक्त मूत्रपिंडाचेच प्रत्यारोपण करणे शक्य झाले.
शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आल्याने मुलूंड येथील खासगी रुग्णालयात ६१ वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले. ही व्यक्ती दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार केले. मात्र, उपचारदरम्यान या व्यक्तीचा मेंदू मृत झाला. रुग्णांचा मेंदू मृत झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना व झोनल ट्रान्सप्लांट समन्वय समितीला (झेडटीसीसी) दिली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व झेडटीसीसीच्या समन्वयकांनी मेंदूमृत रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाची माहिती दिली.
मेंदूमृत व्यक्तीची पत्नी व दोन मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वच अवयव दान करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार अवयवदानाची प्रक्रिया करण्यात आली; परंतु मेंदूमृत व्यक्तीच्या फक्त मूत्रपिंडाचेचे प्रत्यारोपण शक्य झाले, तर हृदय आणि यकृत ही वैद्यकीयदृष्ट्या निकामी ठरल्याने त्यांचे प्रत्यारोपण शक्य झाले नसल्याची माहिती झेडटीसीसीकडून देण्यात आली. झेडटीसीसीचे सचिव डॉ. भरत शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये होत असलेल्या जनजागृतीमुळेच कुटुंबीयातील व्यक्तींनी सर्व अवयव दान करण्यास मंजुरी दिली. या वर्षातील हे दुसरे यशस्वी अवयवदान ठरले आहे.