Mumbai Coastal Road :मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई कोस्टल रोडचा दुसरा भुयारी बोगदा मंगळवारपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किनारपट्टीची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत मरिन ड्राईव्हपासून उत्तरेकडे जाणारा दुसरा भुयारी बोगदा उद्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
मरीन ड्राइव्ह पासून उत्तरेला भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक (लोटस जेट्टी) व वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली चौक) या तीन मार्गांपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच किनारी रस्ता प्रकल्प मार्गे उत्तरेकडे प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा टप्पा देखील जुलै २०२४ पासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून अंतिम टप्प्यातील कामे देखील वेगाने पूर्ण केले जात आहे. या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हपासून सुरु होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरु राहणार आहे. तर शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
यापूर्वी वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. या सुरू करण्यात आलेल्या वाहतुकीचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यानंतर आता मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे ६.२५ किलोमीटर लांबीचा मार्ग खुला झाला आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांवरुन उतरुन किंवा प्रवेश करुन वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.
"मुंबईकरांना वाहतुकीतून दिलासा देणारा छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड प्रकल्प आहे. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला होईल नरिमन पॉईंटकडून येणारा व मुंबईकडून वरळीकडे जाणारा सव्वा सहा किलोमीटरचा टनेल हाजीअली येथे सुरू करण्यात आला आहे. वरळीकडून नवी मुंबईकडे जाणारा ९ किलोमीटरचा टनेल सुरू केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित असलेला वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा भाग जुलैमध्ये सुरू केला जाईल. मुंबईसारख्या शहरातल्या अतिशय रहदारी रस्त्यांवर मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा काही महिन्यांपूर्वी सुरू झाला, तर दुसरा टप्पा आजपासून आपण सुरू करत आहोत आणि तिसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू करण्यात येईल. अगोदर मरीन ड्राइव ते हाजीअली पर्यंत ४० ते ५० मिनिटांचा प्रवास करावा लागत होता पण आता हाच प्रवास ८ मिनिटांत करता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोस्टल रोड बांधला आहे. रस्त्यांचा विस्तार होतोय तसंच मंत्रिमंडळ विस्तार ही लवकरच होईल," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.