केशरी कार्डधारकांना उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील धान्यपुरवठा सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:51 AM2020-05-09T01:51:58+5:302020-05-09T01:52:04+5:30
२५ टक्के वाटप पूर्ण : धान्यटंचाईची दुकानदारांची ओरड
खलील गिरकर
मुंबई : केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळवाटप करण्यात येत आहे; त्यापैकी २५ टक्के कार्डधारकांना वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित ग्राहकांना १० मेपासून दुसºया टप्प्यात धान्यवाटप करण्यात येणार आहे. २४ एप्रिलपासून हे वाटप सुरू करण्यात आले होते.
मुंबई व ठाणे विभागाचे शिधावाटप नियंत्रक तथा अन्न व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे म्हणाले, आम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामधील अंत्योदय व प्राधान्यगट कुटुंबांना पाच किलो विनामूल्य तांदूळवाटप करायचे आहे. मे महिन्यातील हे धान्यवाटप १० मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल व त्यानंतर केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने गहू व तांदूळवाटप केले जाणार आहे.
नेहमीपेक्षा तिप्पट धान्यवाटप करावे लागत असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. मात्र हे काम सुयोग्यरीत्या व्हावे यासाठी पूर्ण क्षमतेने काम केले जात आहे. एकाच वेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामधील अंत्योदय व प्राधान्यगट कुटुंबांना वाटप करायचे धान्य व केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने द्यावे लागणारे गहू व तांदूळ रेशन दुकानांमध्ये ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही; त्यामुळे एका गटाचे वाटप पूर्ण केल्यानंतर दुसºया गटाचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच किलो मोफत तांदूळवाटप १० मेपर्यंत केले जाईल व त्यानंतर सवलतीच्या दरातील धान्यवाटपाला प्रारंभ केला जाईल, असे पगारे यांनी स्पष्ट केले.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारांपेक्षा कमी आहे व ज्यांची राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नोंदणी झालेली नाही अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना ८ रुपये किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळवाटप करण्यात येत आहे. प्रति माणसी तीन किलो तांदूळ व दोन किलो गहूवाटप करण्यात येत आहे. मे व जून महिन्याचे धान्य याद्वारे दिले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामधील अंत्योदय व प्राधान्यगट कुटुंबांना पाच किलो मोफत तांदूळ सोबत प्रति कार्ड एक किलो डाळ देण्यात येणार आहे. एप्रिल व मे महिन्याची मिळून एकत्रितरीत्या दोन किलो डाळ देण्यात येणार आहे.
धान्य संपल्याने वाटप बंद
शिधावाटप दुकानांमधील गहू व तांदूळ संपले असल्याने धान्य येईपर्यंत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरातील गहू व तांदूळवाटप बंद करण्यात येत असल्याची माहिती शिवडी परिसरातील काही रेशन दुकानदारांनी दिली. १० मेपर्यंत हे धान्य आल्यानंतर त्यानंतर वाटप सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. वाटपासाठी आलेले धान्य समाप्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.