मोनोचा दुसरा टप्पा २ मार्चपासून रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:28 AM2019-02-26T00:28:48+5:302019-02-26T00:28:53+5:30
वडाळा ते सात रस्ता या मार्गावर धावणार : मोनो प्रकल्पाचा पूर्ण मार्ग होणार कार्यान्वित
मुंबई : चेंबूर-वडाळा-भायखळा (सात रस्ता) या मोनो रेल्वेच्या मार्गावरील दुसऱ्या म्हणजे वडाळा ते सात रस्ता या टप्प्याचा बार २ मार्च रोजी उडणार आहे. या दिवशी मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार असून, या दिवसापासून मोनोचा पूर्ण मार्ग कार्यान्वित होईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यावर म्हणजे चेंबूर ते वडाळा या मार्गावर सध्या तीन मोनो रेल्वे धावत आहेत. दुसºया टप्प्याचे उद्घाटन झाले की, यात आणखी दोघांची भर पडेल. म्हणजे या मार्गवर एकूण पाच मोनो रेल्वे धावतील.
गेल्या वर्षी मोनो रेल्वे मार्गावर आगीची दुर्घटना घडली होती. परिणामी, काही काळ मोनो रेल्वे बंद होती. शिवाय स्कोमी कंपनी आणि एमएमआरडीएमध्ये झालेल्या वादानंतर प्राधिकरणाने मोनो रेल्वेचा ताबा आपल्याकडे घेतला होता. आता मार्गातील अडथळे पार पाडत मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा रुळावर आल्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, शिवाय उर्वरित वाहतुकीवरील ताणही कमी होईल.
आरामदायी प्रवास शक्य
सध्या वडाळा ते लोअर परेल प्रवास करायचा असल्यास, मुंबईकरांना बस किंवा टॅक्सीचाच पर्याय आहे. टॅक्सीचे भाडे आणि बसमध्ये प्रवास करताना होणारी वाहतूककोंडी मुंबईकरांचा मनस्ताप वाढविणारी ठरत आहे. त्यामुळेच मोना रेल्वेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर आरामात प्रवास करणे शक्य होईल, असा सूर मुंबईकरांमध्ये आहे.