मुंबईतील भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच प्रवासी सेवेत?; शहरातील 'या' स्थानकांदरम्यान धावणार मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 05:49 IST2025-04-08T05:49:10+5:302025-04-08T05:49:27+5:30
पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळून मेट्रो मार्गिका सुरू होऊ शकेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईतील भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच प्रवासी सेवेत?; शहरातील 'या' स्थानकांदरम्यान धावणार मेट्रो
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) तपासणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सीएमआरएसकडून प्रमाणपत्र मिळताच या मेट्रोचा दुसरा टप्पा काही दिवसांत सुरू होणार आहे.
सीएमआरएस पथकाने सोमवारपासून या तपासणीला सुरुवात केली आहे. पुढील तीन ते चार दिवस ही तपासणी चालणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळताच ही मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळून मेट्रो मार्गिका सुरू होऊ शकेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मेट्रो गाडीच्या मार्गावरील चाचण्या सुरू
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ३३.५ किमी लांबीची मेट्रो ३ मार्गिका उभारली जात आहे. त्यावर २७ स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी मार्ग ऑक्टोबरपासून सुरू झाला. या मार्गावर १० स्थानकांवर मेट्रो धावू लागली आहे.
आता बीकेसी ते वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. एकूण सहा मेट्रो स्थानकांदरम्यान मेट्रो गाडी धावणार आहे. त्यातून आरे ते वरळी नाका असा प्रवास मेट्रोने करणे शक्य होणार आहे.
त्यादृष्टीने एमएमआरसीने मेट्रो गाडीच्या मार्गावरील चाचण्या सुरू पूर्ण केल्या आहेत. आता सीएमआरएस प्रमाणपत्राची केवळ प्रतीक्षा आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.
या स्थानकांदरम्यान धावणार मेट्रो
बीकेसी, धारावी, शितळादेवी मंदिर, दादर, सिद्धीविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक
दुसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मार्गाची लांबी
९.७७ किलो मिटर