मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसºया टप्प्यात राज्यातील १0 मतदारसंघांत १८ एप्रिलला मतदान होणार असून, त्यासाठीच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, बीड, लातूर, अमरावती, अकोला, बुलडाणा व सोलापूर या १0 जागांवरील १६७ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी ईव्हीएममध्ये बंद होईल.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, खा. प्रीतम मुंडे या दिग्गजांचे भवितव्य या टप्प्यात ठरेल. बीडमध्ये प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे या लढतीला, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंविरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संघर्षाची किनार आहे. मोदी लाटेतही गेल्या वेळी चांगल्या मताधिक्याने जिंकलेले अशोक चव्हाण यांच्यासमोर नांदेडमध्ये आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचे आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला व सोलापूरमध्ये तिहेरी लढतीला सामोरे जात आहेत. अकोल्यात त्यांची लढत भाजपचे खा. संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्याशी आहे. दुसºया टप्प्यातील लढतीत प्रीतम मुंडेंसह युवा स्वाभिमानीच्या नवनीत कौर राणा (अमरावती) या दोन प्रमुख महिला उमेदवार आहेत. सुनील गायकवाड (भाजप-लातूर), प्रा. रवींद्र गायकवाड (शिवसेना-उस्मानाबाद) आणि राजीव सातव (काँग्रेस-हिंगोली) हे तीन खासदार निवडणूक रिंगणाबाहेर आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:34 AM