Join us  

महिलांच्या तस्करीत मुंबई दुसऱ्या स्थानी - विजया रहाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:28 AM

महिलांच्या तस्करीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलांच्या तस्करीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. याबाबत विचारमंथन करण्यासाठी पुढील आठवड्यात जुहू येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, देशात महिलांच्या तस्करीत कोलकाता प्रथम, तर मुंबईमुळे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दरवर्षी सुमारे १० हजार महिलांची तस्करी होत असून, मुंबईत पश्चिम बंगालसह बांगलादेश, घाना, रशिया येथून मोठ्या प्रमाणात महिलांची तस्करी होत आहे. तरी सामाजिक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महिला तस्करीमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण घटले आहे. मुंबईत १४ वर्षांखालील मुलींची तस्करी जवळपास बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईसह जगातील महिलांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय फोरम तयार करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. त्या दृष्टीने २७ आणि २८ जुलै रोजी मुंबईत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्र व राज्य शासनाच्या महिला तस्करीला प्रतिबंध करणाऱ्या विभागाच्या सचिवांपासून प्रत्येक राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्ष सहभागी होतील. याशिवाय २० देशांतील सुमारे १०० प्रतिनिधीही या परिषदेस उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.मंजुळा शेट्ये प्रकरणाची चौकशी वेगानेभायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याची माहितीही रहाटकर यांनी दिली. महिला कैद्यांना मिळणाऱ्या आरोग्य आणि सेवा-सुविधांचा प्रत्यक्षदर्शी अहवाल समितीने सादर केल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मान्यवर साधणार संवादकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विजया रहाटकर हे परिषदेत केंद्रीय व राज्य सरकार यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव सुमित मलिक, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, तेलंगणचे पोलीस आयुक्त महेश भागवत, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदेर, आयटीपीएच्या माजी दंडाधिकारी स्वाती चौहान हे या परिषदेत संवाद साधणार आहेत.